Tuesday, February 15, 2011

शिक्षण


एकंदरीत सध्या पोरांच्या आनंदाचा 'निकाल' लागलेला आहे...
...उन्हाळयाच्या सुटयांमधली सगळी मजा संपून गेली आहे. दहावीबारावीचे निकाल लागल्यानंतरही शिक्षण खाते आणि शिक्षणमंत्री यांचे उलटसुलट आदेश आता पोरांबरोबरच पालकांचीही परीक्षा घेतायत. जिकडे तिकडे ऍडमिशन्सची धांदल, गोंधळ, टेन्शन...
तुला किती? 96.5?
मजा आहे! मला फक्त 95.8!
पहिली लिस्ट लागली का? कट ऑफ किती परसेंटला?
पसर्ेंटाइलच्या हिशोबात बसतायत का? हरे राम! सेकंड चॉइस कुठल्या कॉलेजचा आहे? तिकडचा फॉर्म भरलाय का?
उठा, पळा, धावा!
पाऊस असेल, तर छत्री घ्या.
गाडया बंद पडल्या, तर चालत जा.
लाइन मोठी आहे, मग आदल्या रात्रीच कॉलेजच्या गेटवर जाऊन उभे राहा.
काय वाट्टेल ते करा, पण, सायन्सला ऍडमिशन मिळवा.
काय वाट्टेल ते करा, पण, कॉमर्सला ऍडमिशन मिळवा.
काय वाट्टेल ते करा, पण, चांगल्या कॉलेजात आर्ट्सला ऍडमिशन मिळवा...
...
...
...
श्री मात्र या सगळयापासून मुक्त आहे. श्री म्हणजे राजश्री. यंदाच दहावीची परीक्षा पास झालीये ती. तरीही ती या सगळयापासून मुक्त कशी?
कारण तिला फक्त 45 टक्के मार्क्स मिळाले आहेत. आता तिला (घ्यायचीच असेल, तर) कुठल्यातरी फारसं नाव नसलेल्या कॉलेजात आर्ट्सला (तीही शेवटच्या लिस्टमध्ये) ऍडमिशन मिळेल.
श्री काही एकटी नसेल ना अशी?
तिच्यासारखे अनेक विद्यार्थीविद्यार्थिनी असतील... इन फॅक्ट, पास झालेल्यांमध्ये सगळयात जास्त संख्या या 40 ते 60 टक्क्यांमधल्या मुलांचीच असेल. जे नापास होतात, ते सुटतात. त्यांना दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी तरी मिळते. 40 ते 60 टक्के मिळवून जे पास होतात, ते जगाच्या लेखी 'नापास'च असतात की... कायमचे.
तसं नसतं तर सगळी चर्चा फक्त 'गुणवान' मेरिट लिस्टवाल्या विद्यार्थ्यांभोवती फिरत राहिली नसती. गेल्या काही दिवसांतले सगळे पेपर उघडून पाहा. 80 टक्क्यांच्या वर मार्क मिळवणाऱ्यांच्या स्वागतासाठी मोठया माणसांचं, शिक्षणाचं जग अगदी बाहू पसरून सज्ज आहे. 7080 टक्केवाल्यांना थोडं नाक मुरडून का होईना, इथे प्रवेश आहे. 40 ते 60 टक्केवाले मात्र ना इधर के ना उधर के.
...
...
...''होईल, होईल. कुठे ना कुठे ऍडमिशन होईल,'' कुणीतरी श्री ला धीर देण्याचा प्रयत्न केला.
''पण, एवढे कमी मार्क म्हणजे... चॉइस नाही राहात ना आपल्या हातात,'' श्रीचे बाबा मवाळ आवाजात म्हणाले.
''अहो, नाहीतरी आजकाल या शाळाकॉलेजच्या शिक्षणावर फारसं काही अवलंबून नसतं. (बोंबला! आणि तिकडे 9598 टक्केवाले उगाचच धावपळ करून राहिलेत.) खूप कोर्सेस असतात वेगवेगळया विषयांचे. मिळेल तिथे ऍडमिशन घ्यायची आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रातला एखादा कोर्स करायचा. घाई काय आहे? हळूहळू समजेल आपल्याला कोणत्या विषयात रस आहे, कोणत्या क्षेत्रात गती आहे. सापडेल मार्ग.''
''पण मला मुळात शिक्षणात इंटरेस्टच नाही,'' श्री ने बाँब टाकला, ''मी अगदी काही ढ नाहीये. पण, शाळेत कोणत्याच विषयात मला कधी खास आवड निर्माण नाही झाली. त्यामुळे मी अभ्यासही जेवढयास तेवढा केला. मला खास कोणती कला अवगत आहे, असंही नाही. मला कुठेही ऍडमिशन मिळाली, कुठलाही कोर्स केला, तरी मला माहितीये मला 4045 टक्केच मार्क मिळणार. माझी कुवतच तेवढी आहे. मग मी का शिकायचं?''
यावरचं एक उत्तर शिक्षणविषयक पोपटपंची करणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक असतं...
'आपल्याला गरज असो वा नसो. प्रत्येकाने पदवीपर्यंतचं शिक्षण घ्यायलाच हवं. कारण शिक्षण तुम्हाला सुसंस्कृत बनवतं. तुमच्या मनाच्या कक्षा रूंदावतं. वगैरे वगैरे वगैरे.''
...जरा आपल्या आसपासचा शिक्षणाचा सगळा बजबजलेला बाजार पाहून, नीट विचार करून सांगा... आपल्या या सिस्टीममध्ये हे उत्तर खरोखरच देऊ शकतो का आपण कुणाला?

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment