Friday, February 11, 2011

शून्य हरवलेला देश

शून्य म्हणजे शून्य.
 
निर्गुण, निराकार, नि:शेष.
 
जिथे काहीच नसते ती जागा.
 
स्टार्टिग पॉइंट.
 
तिथून सगळी सुरुवात करायची.
 
सगळी मोजमापेही तेथूनच सुरू होतात.
 
शून्य नसेल, तर मोजणार काय आणि कसे?
 
आधी शून्य ठरवायला लागते आणि या देशात तर शून्यच हरवून बसले आहे.
 
काय विलक्षण विनोद आहे.
 
या देशाची जगाला सगळय़ात मौलिक देणगी काय, तर शून्य.
 
एकदोनतीनचारपाचसहा तर सगळेच करत होते आपापल्या भाषेत. पण काहीच नसणे यालाही एक चिन्ह हवं आणि त्याचंही मोजमाप हवं हे ओळखलं आपल्या पूर्वजांनी. मग सगळय़ा जगाचं गणित बदललं.
 
गंमत म्हणजे शून्यानंतरचं आपलं सगळय़ात मोठं काँट्रिब्युशन काय असेल, विचार करा. शोध घ्या. त्याचंही उत्तर शून्य असंच येतं.. काहीही नाही या अर्थाचं शून्य.
 
विश्वास बसत नसेल, तर आपण जे कपडे परिधान करतो तिथपासून जी साधनं वापरतो, ज्या सुखसुविधा वापरतो, आपल्या आसपास जे जे दिसतं, त्यातलं (पानाच्या पिचका-या आणि जळीस्थळीकाष्ठीपाषाणी केलेला कचरा सोडून) काय अस्सल भारतीय, मूळ भारतीय किंवा भारतात शोध लागलेले आहे, ते शोधा. आपण किती परपुष्ट आहोत, याचे भान येईल.
 या सगळय़ाचा शून्य हरवण्याशी निश्चित असा संबंध आहेच. शून्य ही अधिक काही घडण्याची सुरुवात असते. तशी शून्य हरवणं, ही उणे घडण्याची, इथल्या अनेक ऱ्हासांची सुरुवात. इथलं शून्य नेमकं कधी हरवलं ते निश्चित सांगता येणार नाही. ते हरवण्याची प्रक्रिया शेकडो वर्षे निरंतर चालू आहे, एवढंच सांगता येईल.
शून्यच हरवल्यामुळे सगळय़ात मोठी पंचाईत अशी होऊन गेली आहे की आपण नेमके कुठे आहोत, हे कोणीच सांगू शकत नाही आणि ज्या देशातील कोणीही हे सांगू शकत नाही, त्या देशाचीही तीच (आपण नेमके कोठे आहोत, हे ठरवू न शकण्याची) पंचाईत असणार, हे कोणी सांगायला नकोच.
 
देशाचं शून्य हरवलंय याची सर्वात मोठी खूण काय?
 
आपण शून्यरेषेवर आहोत, असं देशातल्या प्रत्येकाला वाटणं.
 
हे एक अद्भुतच आहे. देशातले सगळे बोलके पोपट 2020 मध्ये महासत्ता होण्याच्या बाता मारताहेत आणि त्याचवेळी अख्खा देश शून्यरेषेवर दाटीवाटी करून उभा आहे.
 
आपल्यावर पिढय़ा न् पिढय़ा अन्याय झालाय, प्रगतीची सोडा- साधी माणूस म्हणून जगण्याची संधीही आपल्याला नाकारली गेलीय, त्यामुळे आपणच शून्यरेषेवर आहोत, असं काहींना वाटतं. घटनेनं ते मान्यही केलं आहे आणि त्यांना स्टार्टिग पॉइंटवर आणण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली आहे.
 
आता त्यात इतरांची भर पडते आहे. इतरांची स्थिती अधांतरी. ना वर ना खाली. आधी त्यांना वर असणं बरं वाटत होतं. त्यात पोकळ स्टेटस जपलं जात होतं. जेव्हा खालचे वर सरकू लागले, तेव्हा यांना आपणही खालीच आहोत, याचं भान आलं आणि आम्हीसुद्धा, आम्हीसुद्धा म्हणत तेही शून्यरेषेकडे धावले. आता दिवसेंदिवस इतरांची संख्या अशी वाढते आहे की इतरेतर कुणी शिल्लक राहील का, हाच प्रश्न आहे.
 
असं कसं? ते आमच्या बरोबर कसे? मेरिटबिरिट काही आहे की नाही, असा आक्षेप घेणा-या पुढारलेल्यांना केवळ ते आपल्याबरोबर आहेत म्हणून आपणही शून्यरेषेवरच आहेत, असं वाटतं. आपल्या पिढय़ा न् पिढय़ांनी पूजा-पाठाच्या, लिखापढीच्या, राज्यकारभाराच्या, व्यापार-उदीमाच्या क्षेत्रात शेकडो वर्षे शंभर टक्के आरक्षण उपभोगलं आहे, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो. आधीच्या पिढय़ांनी जे काही केलं, त्याचा भार मी का वाहावा, जे मी केलं नाही, त्याची शिक्षा मला कशाला? असा कांगावाही ते करतात. आधीच्या पिढय़ांचं रंग, वर्ण, जात, स्थावर-जंगम मालमत्ता या सगळय़ांचा वारसा हवा आणि हा नको, असं यांचं सिलेक्टिव्ह मेरिट. गतजन्मीचं अज्ञात आणि काल्पनिक पाप यांना मान्य. गतपिढय़ांचा ज्ञात आणि वास्तव वारसा मात्र नाकारायचा.
 पुढारलेल्या कुळांची शेखी मिरवणारांची गोची आणखी वेगळी. हे तर तहहयात सत्ताधारी. पारंपरिक राज्यकर्ते. वेशीबाहेरची बेणी आता आपल्या डोस्क्यावर येऊन बसतायत म्हटल्यावर यांना आपला मूळ पेशा आठवला आणि समाजाच्या कल्पनाचित्राच्या हातातली तलवार गळून पडली, तिच्याजागी औत आलं. ही तलवार लग्नात मात्र टोकाला लिंबू लावायला वर येते. म्हणजे नोकरी, राजकारण यात मागास म्हणून आरक्षण हवं आणि रोटी-बेटी व्यवहारात उच्चकुळांचा तोराही हवा.
यांच्यातलेच काही आता मागासलेपणा-पुढारलेपणा याचा आधार मोडून काढा म्हणतायत. आपली जात भारतीय लिहितायत. भयंकरच क्रांतिकारक विचार. म्हणजे आपल्याला फायदाच नसल्यामुळे गैरसोयीच्या व्यवहारातून जात वजा करायची आणि रोटी-बेटी व्यवहार मात्र आपल्यातच करायचे, असं सोयीस्कर जातनिर्मूलन.
 
जाता नाही जात, म्हणतात, ते उगाच नाही.
 
ती जात नाही आणि शून्य हातात येत नाही.
 
काहीच्च्या काहीच आक्रित घडतंय.
 
पुढे जायच्या ऐवजी अख्खाच्या अख्खा देश मागासवर्गात सामील व्हायला उलटा धावतोय..
 
..सगळा देश स्टार्टिग पॉइंटवरच आहे..
 ..स्टार्ट घेतल्याला साठ वर्षं उलटून गेल्यानंतरही.

(16/5/10)

No comments:

Post a Comment