Thursday, February 10, 2011

वाजले की बारा..

(स्थळ मंत्रालय. एका टेबलाभोवती काही अधिकारी बसून खल करताहेत. चेह-यांवर वैताग.)
 
अधिकारी ‘अ’ - काय साली मगजमारी आहे.. चित्ररथाचा विषय ठरवा म्हणे! इतर कामं नाहीत का आम्हाला?
 
अधिकारी ‘ब’ - हो ना! कित्ती कामं पडलीयेत. कायदेशीर बांधकामांमध्ये खुसपटं काढायचीयेत. बेकायदा बांधकामं नियमित करून घ्यायचीयेत. अनधिकृत मजले
सँक्शन करायचेत
.
अधिकारी ‘क’ - टेंडरं काढायचीयेत. मोकळ्या भूखंडांची यादी मंत्रिमहोदयांना द्यायची आहे.
 
अधिकारी ‘ड’ - तीच यादी मला गुपचूप बिल्डरांकडे पोहोचवायची आहे..
 
अधिकारी ‘अ’- इतकी सगळी महत्त्वाची कामं असताना हे झेंगट गळ्यात आलंय आपल्या.
 
अधिकारी ‘ब’ - फार विचार करत बसू नका. 26 जानेवारीचा दिल्लीतला चित्ररथ बनवायचाय ना? इथे किंवा तिथे कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी चालेल असा
 विषय सांगतो. फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना रथावर घ्या. लगेच आयडिया सँक्शन होते का नाही पाहा.
 
अधिकारी ‘क’- अहो, शिवाजी महाराज आले की वाद आलाच. त्यांच्यासोबत कोणाचा पुतळा दाखवायचा आणि कोणाचा काढायचा? उगाच नसतं लफडं नको.
 
अधिकारी ‘ड’- मुळात त्यांना आजच्या महाराष्ट्रावर आधारलेला देखावा हवाय.
 
अधिकारी ‘अ’- मग तसं सोप्पं काम आहे. एक शेत दाखवूयात.. म्हणजे नुसती जमीन, भेगाळलेली. एक झाड दाखवूयात. त्याला गळफास लावून घेतलेला शेतकरी.
 
अधिकारी ‘ब’- सॉलिड आयडिया! पण, एवढय़ा मोठय़ा रथावर फास घेतलेला एकच शेतकरी दाखवला तर खूप जागा मोकळी राहील.
 
अधिकारी ‘क’ -तिथे आणखी झाडं दाखवा आणि त्यांना सगळ्यांना फास घेतलेले शेतकरी. म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत हमखास उगवणारं एकच पीक- फास घेतलेल्या शेतक-यांचं पीक, असं आपोआप स्पष्ट होईल.
 
अधिकारी ‘ड’ - यात नाटय़ नाही.
 
अधिकारी ‘अ’ : असं म्हणताय. मग, फास घेतलेल्या शेतक-याच्या समोर दुसरा जिवंत शेतकरी दाखवूयात. त्याला सावकार सानंदाने चाबकाचे फटकारे मारताहेत, असा सीन बनवूयात.
 
अधिकारी ‘ब’-तरी पूर्ण जागा भरणार नाही.
 
अधिकारी ‘क’- मग आणखी एक सीन करू. राज्याचे गृहमंत्री ‘सावकारांची सालटी सोलून काढू’ अशी डरकाळी फोडताहेत, असं दाखवूयात.
 
अधिकारी ‘ई’ (हे ज्येष्ठ अधिकारी एवढा वेळ फायलींचा निपटारा करण्यात मग्न होते, ते प्रथमच चर्चेत भाग घेताहेत) - मुख्यमंत्री फोनवरून पोलिसांना सावकाराचंच रक्षण करण्याच्या सूचना देताहेत, असं दाखवलं की झाला देखावा पूर्ण.. अरे शुद्धीत आहात ना तुम्ही सगळे. की सकाळीच.. (अंगठय़ाने ‘योग्य ती’ खूण करतात.) राज्य सरकारची कामगिरी दाखवणारा चित्ररथ उभा करायचाय आपल्याला.
 
उर्वरित सगळे अधिकारी - तीच तर दाखवतोय की आपण!
 
अधिकारी ‘ई’- ते बरोबर आहे तुमचं, पण.. राज्याचं नाव गाजवणारा एखादा दुसरा विषय दिसत नाही का तुम्हाला?
 
अधिकारी ‘अ’- असं म्हणताय? मग 31 मजली इमारतीचा कटआऊट उभारायचा आणि तिच्यावर नाव लावायचं..
 
अधिकारी ‘ब’ - आदर्श हाऊसिंग सोसायटी!
 
अधिकारी ‘क’- पुन्हा रिकाम्या जागेचा प्रश्न आलाच.
 
अधिकारी ‘ड’ - तो सोडवणं सोपं आहे. आणखी एक इमारत दाखवायची. तिच्यावर बोर्ड.. ‘हरिसिद्धी’.
 
अधिकारी ‘अ’ - करेक्ट. अशा तर वाट्टेल तेवढय़ा इमारती दाखवता येतील आपल्याला. त्या कमी पडल्या तर बाकी जागेत उल्हासनगरची प्रतिकृती उभारता येईल नाहीतर ठाणे जिल्ह्याची.
 
अधिकारी ‘ब’ -हा मस्त होईल देखावा. नुसती सपाटी दाखवायची गरज नाही. एका साइडला येऊर आणि पवईच्या टेकडय़ा पण दाखवता येतील बेकायदा बांधकामांनी पोखरलेल्या.
 
(सगळे ‘ई’साहेबांकडे बघतात.)
 
अधिकारी ‘ई’- तेही कमी पडलं तर एक तळं दाखवा आणि त्याकाठी वसवलेलं लवासा दाखवा! आता तर माझी खात्रीच पटलीये की तुम्ही दिवसासुद्धा.. (पुन्हा अंगठय़ाने ‘योग्य ती’ खूण करतात.) अरे ज्याच्यातून राज्याची काही पॉझिटिव्ह बाजू दिसेल, असे विषय शोधा.
 
अधिकारी ‘अ’ - असं म्हणताय?
 
अधिकारी ‘ब’ -मग फारच कठीण आहे.
 
अधिकारी ‘क’ - एखादी समितीच नेमायला लागेल.
 
अधिकारी ‘ड’ - तिलाही तीन-चार वर्ष लागतील शोधायला.
 
अधिकारी ‘अ’ - आयडिया! आपले पोलिस कसे डॅशिंग आणि कर्तव्यकठोर आहेत, हे दाखवू शकतो आपण.
 
अधिकारी ‘ब’ - ते कसं?
 
अधिकारी ‘क’ - सोप्पं काम. वसईतला देखावा बनवायचा. हेल्मेट आणि चिलखत घातलेले पोलिस सामान्य माणसांना झोडपून काढताहेत, घरात घुसून बायका-पोरांनाही चोपताहेत, आमदाराला उचलताहेत, असं दाखवता येईल.
 अधिकारी ‘ड’ - ग्रेट. इथेही जागा रिकामी राहिली तर एका खोलीत कर्तव्यनिष्ठुर पोलिस एका उद्दाम आमदाराला बेदम चोपताहेत, असाही सीन जोडता येईल.
(सगळे पुन्हा ‘ई’साहेबांकडे पाहतात. ते आता ब्लडप्रेशर आटोक्याबाहेर गेल्याप्रमाणे लालबुंद झालेत. भावना दाटून बोलणं अशक्य झाल्याने घशातून घुसमटलेले आवाज काढून ते काही अर्वाच्य हातवारे करतात आणि अखेरीस कसेबसे बोलतात.)
 
अधिकारी ‘ई’ - तुम्ही सरकारी विषय सोडा. सामाजिक विषय शोधा.
 
अधिकारी ‘अ’ - असं म्हणता. पूर्वी मुंबईचे डबेवाले उभे केले होते आपण चित्ररथावर. तसंच ना!
 
(‘ई’साहेब मान डोलावतात.)
 
अधिकारी ‘ब’ - मग सोपं काम आहे. या वेळी आपण मुंबई-ठाण्याचे रिक्षावाले घेऊयात. रिकामी रिक्षा दाखवायची. आत रिक्षावाला. बाहेर खूप माणसं उभी. ती त्याला येतोस का विचारताहेत आणि तो फक्त ‘नाही नाही’ म्हणून भाडं नाकारतोय..
 
अधिकारी ‘क’ - पुन्हा जागा मोकळी राहणार खूप..
 
अधिकारी ‘ड’ - तिथे दुसरी रिक्षा दाखवू, ड्रायव्हरशिवाय नऊ प्रवासी घेऊन वाहतूक करणारी.
 
अधिकारी ‘अ’ -शेजारी ट्रॅफिक हवालदारही दाखवता येईल, रिक्षावाल्याकडे दुर्लक्ष करून सायकलवाल्याला फाइन मारणारा.
 
अधिकारी ‘ब’ - वा वा, रंगतोय बरं का देखावा. एखादा रिक्षावाला पोलिसाच्या हातात ‘पुडी’ सरकवतानाही दाखवता येईल.
 
अधिकारी ‘क’ - एकच प्रॉब्लेम आहे.. इकडच्या रिक्षावाल्यांना इतका भाव दिला तर पुण्यातले रिक्षावाले आंदोलन करतील. मूळ उर्मटपणाची परंपरा त्यांची असताना त्यांना चित्ररथावर स्थान दिलं नाही म्हणून.
 
(पुन्हा सगळे ‘ई’ साहेबांकडे पाहतात.)
 
अधिकारी ‘ई’ - हे पाहा. तुम्ही सांस्कृतिक परंपरेकडे वळा. जेव्हा वर्तमान सडलेला असतो, तेव्हा तेच सोयीचं असतं.
 
(लगेच एक अधिकारी तोंडानं ‘टण टण टण टण’ असा ढोलकीचा ताल धरतो, दुसरा तुणतुणं वाजवल्याची अ‍ॅक्शन करतो, तिसरा पदर हलवल्यासारखे हात हलवत नाचू लागतो आणि चौथा डोईवरचा फेटा उडवल्याची अ‍ॅक्शन करतो.)
 
अधिकारी ‘अ’ - लावणी.. मस्तपैकी लावणीच रंगवूयात चित्ररथावर.
 
अधिकारी ‘ई’ (प्रथमच मोकळेपणाने हसून) - करेक्ट, त्यातून आपली उज्वल परंपरा दिसेल आणि ‘वाजले की बारा’ गाणं लावून राज्याची वर्तमान स्थितीही दाखवता येईल.     


(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(23/1/11)

No comments:

Post a Comment