Thursday, February 10, 2011

बनी आणि बनचुके..

‘‘बने बने, उठ आणि चल लवकर..’’
 
‘‘कुठे घेऊन चालला आहात काका मला? आणि असा हात पकडून खेचू नका हं मला. मी कालच ‘वाटेवरती काचा गं’ हे नाटक पाहून आलेली आहे..’’
 
‘‘अगं वेडाबाई, मी तशातला काका वाटलो का तुला? आणि तुझ्यासारख्या अशा सतर्क मुलीशी कोणता काका दुवर्तन करण्याचा प्रयत्न करील?’’
 
‘‘काका, मराठी पेपर वाचून आलात का आत्ताच?’’
 
‘‘अरे व्वा, आमची बनी नुसतीच जागृत नाही, मनकवडीसुद्धा आहे म्हणायची तर..’’
 
‘‘कौतुक पुरे आणि त्या निमित्ताने गालगुच्चा घ्यायला हात पुढे करू नका, मी चावेन जोरात. तुम्ही ‘सजग’ला ‘सतर्क’ म्हणालात, ‘दुर्वर्तन’वरचा एक रफार खाल्लात, तेव्हाच मला कळलं की तुम्ही मराठी पेपर वाचून आलेला आहात. नंतर जागरूकसारखा साधा शब्द वापरायच्या ऐवजी एकदम एखाद्या दैवतासारखी मला ‘जागृत’ केलीत, तेव्हा तर शिक्कामोर्तबच झालं. तरी बरं, तुम्ही मराठी न्यूज चॅनेल बघून आलेले नव्हतात..’’
 
‘‘का गं का?’’
 
‘‘ती बघून आला असतात तर माझ्याशी हिंदीत बोलताय की इंग्रजीत बोलताय की मराठीत, हे कळलंच नसतं मला शेवटपर्यंत. आणि तावातावानं हात हलवत एकटेच बोलत बसला असतात, मला बोलायला संधीच मिळाली नसती.’’
 ‘‘बाप रे, तुझा मराठी पत्रकारितेचा अभ्यास फारच दांडगा आहे. मला वाटलं नव्हतं तुमची अलीकडची पिढी मराठी वर्तमानपत्र वाचत असेल आणि मराठी चॅनेल बघत असेल म्हणून.’’
‘‘काय करणार? मजबुरी आहे.’’
 
‘‘मजबुरी?’’
 
‘‘हो ना. महिन्याला जो काही पॉकेटमनी मिळतो त्यात मल्टिप्लेक्सला जाऊन सिनेमे पाहता येत नाहीत. सायबर कॅफेमध्ये जाऊन गेम्स खेळायला, इतर गंमती करायलाही परवडत नाही. मग टाइमपाससाठी दुसरं काय करणार?’’
 
‘‘टाइमपाससाठी मराठी पेपर वाचतेस आणि बातम्या पाहतेस? हे अजबच आहे.’’
 
‘‘अजब काही नाही काका? अहो, 150 रुपयांत वर्षभराची रद्दी, १० रुपयांत चार महिन्यांची रद्दी, अशा स्कीममध्ये पेपर मिळतात. काही पेपरांची पानं खरवडली की एक्का, दुर्री तिर्री, लंगडा लागतो. घसघशीत बक्षीसं मिळतात. टीव्ही-फ्रीज-वॉशिंग मशीन, तोळे-दोन तोळे सोनं गोळा होतं. त्यामुळे आमच्या बाबांनी आठ पेपर लावलेत घरी.’’
 
‘‘पण, ते तू वाचतेस का?’’
 
‘‘वाचतेस? सो एलएस..’’
‘‘आता हे काय?’’
‘‘म्हणजे लो स्टँडर्ड! हल्ली पेपर कुणी वाचतं का? पेपर पाहतात. मीही तो पाहते. त्यातून सॉलिड एण्टरटेनमेंट होते..’’
‘‘बने, अगं आतापर्यंत तू इतकं छान मराठी बोलत होतीस.. मध्येच एलएस, सॉलिड एण्टरटेनमेंट वगैरे काय सुरू केलंस?’’
‘‘सकाळीच पाहिलेल्या मराठी पेपरची मला आठवण झाली. पण, खरं सांगते काका, मराठी पेपर म्हणजे पैसा वसूल.. टू गुड. 10 रुपयांत चार महिन्यांची रद्दी.. म्हणजे १० रुपयांत १०० रुपयांची गॅरंटी. शिवाय पानं भरभरून मौलिक माहिती.’’
 
‘‘मौलिक माहिती? ती तू कुठल्या पेपरात वाचलीस?’’
 
‘अहो, बातम्यांसारख्या वाचल्या जाणा-या छोटय़ा जाहिराती, बातम्यांच्या जागीच छापल्या जाणाऱ्या मोठय़ा जाहिराती. सिनेमा-नाटकांच्या जाहिराती. जपानी तेलांच्या, चिनी यंत्रांच्या, रत्न-खडय़ांच्या, विनावेदना मूतखडे काढणाऱ्या आयुर्वेदिक तंत्रांच्या जाहिराती. बाकी निविदा सूचना वगैरे.. केवढी माहिती!’’
 ‘‘ओ हो हो! मला उगाच भीती वाटली की तू मौलिक माहिती म्हणालीस ती बातम्यांबद्दल बोलतेयस की काय?’’
‘‘बातम्या पण पाहते ना मी. सगळ्या जाहिरातींमधून मध्ये मध्ये उरलेल्या जागेत छापतात ना त्या? त्या तर खूपच एण्टरटेनिंग असतात. कधी देशाच्या अर्थसंकल्पावर एखाद्या बारावी नापास टीव्ही नर्तिकेची कमेंट असते. दुस-या एका पेपरमध्ये कार्यकारी संपादकच संपादकांची मुलाखत घेतात आणि पाच भागांत छापतात. त्यातून माझी मराठी भाषा किती समृद्ध होते ते ठाऊक नाहीये तुला पादऱ्या पावटय़ा!’’
‘‘अगं ए बने, काय बोलतेयस काय तू?’’
‘‘सॉरी हं काका, आमचा तो दळभद्री पेपर आठवला की असंच स्फुरण चढतं.. आणखी एका पेपरात रोज पहिलं र्अध पानभरून एखाद्या माणसाची महाआरती किंवा एखाद्याची हजामत.. जगात काहीही घडो,
यांची तीच हेडलाइन. या टोकापासून त्या टोकापर्यंत.. दोन ओळींची. कारण यांच्या पेपरचे हेच बादशहा.’’
 ‘‘अगं सव्वा लाखाचा रेट लावला की एवढी ला.. अं अं करावीच लागते.’’
‘‘म्हणजे काय?’’
‘‘काही नाही बने. तू पुढे सांग.’’
‘‘काका, मघापासून मीच काही ना काही सांगते आहे. आज तुम्ही मला कुठे घेऊन जायला आलायत, ते सांगितलंच नाहीत.’’
‘‘अगं मी तुला ना एका वेगळ्याच जगात घेऊन जाणार होतो. नुकताच पत्रकार दिन झाला ना साजरा. त्यानिमित्ताने म्हटलं तुला जरा पत्रकारितेच्या जगाची फेरी मारून आणूयात. पत्रकारांची, पत्रकारितेची माहिती देऊयात.’’
‘‘हे काय असतं?’’
‘‘अगं कमाल झाली. तुझं पेपरांचं, टीव्ही चॅनेलवरच्या बातम्यांचं एवढं मार्मिक निरीक्षण आहे आणि तुला पत्रकारच माहिती नाहीत?’’
‘‘नाही हो, सांगा ना काय करतात ते?’’
‘‘ते बातम्या देतात.’’
‘‘म्हणजे पेपरात जाहिरातींच्या मध्ये शिल्लक राहिलेल्या जागेत पेड न्यूज देतात तेच का ते? की आदल्या रात्री भेटवस्तू किंवा पाकीट मिळाल्यानंतर दुस-या दिवशी पाकीट देणाऱ्याच्या विरोधकावर
शैलीदार आणि परखड टीका करणारे? की टेन परसेंटांच्या आदर्श पद्धतीने चार-चार फ्लॅट पचवून वर सरकारला शहाणपणाचे डोस पाजणारे? की भ्रष्ट मंत्र्याला मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळावं यासाठी स्तंभांमधून लॉबिइंग करणारे? की जिल्ह्यात, तालुक्यात, गावात टोळ्या बनवून खंडणीखोरीची रॅकेटं चालवणारे? महापालिकांची कंत्राटं घेऊन नगरसेवकांच्या वेगानं श्रीमंत होऊन दाखवणारे? की सर्वाकडून हप्ता घेणाऱ्या पोलिसांकडूनही हप्ता घेणारे? की इन्व्हेस्टिगेटिव्ह जन्र्यालिझमच्या नावाखाली ब्लॅकमेलर्सना ब्लॅकमेल करणारे? की गल्ली पत्रकार संघ, आळी पत्रकार संघ स्थापन करून एकमेकांना पुरस्कार देणारे? की नुसतेच इकडून तिकडे भाषांतऱ्ये? की प्रसिद्धीपत्रकांचा शब्दभार इकडून तिकडे टाकणारे हमाल? की..’’‘‘थांब थांब थांब बने, मला जरा घाम पुसू देत. बाळ, मला किनई एकदम गरगरल्यासारखं होतंय. तेव्हा आजचा आपला बेत कॅन्सल. त्यापेक्षा आपण किनई इथेच बसून दोन पेपर वाचू.’’
‘‘आँ..?’’ ‘‘चुकलो, चुकलो.. इथेच बसून दोन पेपर पाहू!’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(9/1/11)

No comments:

Post a Comment