Monday, June 27, 2011

वारीपुरते वारकरी!

आपल्याला शिस्तीचं फार म्हणजे फार आकर्षण..
 
गैरसमज नको.. आपला मूळ सामाजिक स्वभाव बेशिस्तीचाच आहे. त्यावर उतारा म्हणून की काय आपल्याला शिस्त ‘पाहायला’ खूप आवडते..
 
उदाहरणार्थ, काही माणसं भल्या सकाळी अर्ध्या चड्डय़ा घालून, लाठय़ा घेऊन शिस्तीत कदमताल करत निघाली आहेत.. एका तालात पडणारी पावलं, हलणारी शरीरं पाहायला बरं वाटतं.. या लाठय़ांचा ते पुढे कोणाची डोकी फोडायला वापर करतात की त्या नुसत्याच शोभेच्या आहेत वगैरे विचार मनात उमटत नाहीत.. एका गणवेशातला एक प्रचंड जनसमुदाय असा सगळा मिळून एखादं अमानवी यंत्र असल्यासारखा हालतो, याने नजरबंदी होते आणि आत एक हवीहवीशी दहशतीची, मन बधीर करणारी गुंगी पसरते..
 
या शिस्तीला धर्मकांडाची जोड मिळाली की या दोन्ही भावना आणखीच प्रबळ होतात.. सगळ्या बुवा, बाबा, अम्मा, बापू, नाना, अण्णा, महाराजांच्या मठांना किंवा सत्संगांना (इथे घडतो तोच ‘सत्संग’, मग बाकी ठिकाणी माणसं एकमेकांना भेटतात तो काय असत्संग की थेट असंग?) भेट देऊन येणारे तथाकथित विचारी-विवेकी लोकही तिथल्या शिस्तीनं, स्वच्छतेनं आणि सेवाभावानं जाम इम्प्रेस झालेले असतात..
 
‘‘काही म्हणा, तिथली स्वच्छता अगदी पाहण्यासारखी. एवढय़ा विस्तीर्ण परिसरात कागदाचा एक कपटाही दिसणार नाही.. दिसलाच तर भक्त तो उचलून लगबगीनं कचरापेटीत टाकतात..’’
 
वा वा वा! खरोखरीच कौतुकास्पद आहे हो ही स्वच्छता. मग तो भक्त मुंबईला परत आल्यानंतर जागोजाग थुंकून, पिचका-या मारून, शिंकरून, कचरा टाकून अख्ख्या मुंबईची कचराकुंडी बनवायला हातभार लावत असतो, तो का?
 
‘‘तुम्हाला सांगतो, एकावेळी पाच हजार माणसं जेवत असतात महाप्रसादाला. कुठे आरडाओरड नाही, अन्न मागणं नाही, उष्टं टाकणं नाही, आवाज नाही, एक पंगत उठली की दुसरी कधी बसली हे कळतही नाही..’’
 
हे सगळे महानुभाव आपल्या घरच्या लग्नाच्या पंक्तीत का नाहीत एवढी शिस्त दाखवत? रोजची ट्रेन पकडताना आतल्या माणसांना उतरू देण्याइतकं जरी सौजन्य जरी त्यांनी दाखवलं, तर महाप्रसादातून महाबोध घेतला, असं मानता येईल..
 
‘‘हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तर विश्वास बसत नाही, इतकी शांतता आणि अगदी अदबशीर कर्मचारी. ते कर्मचारी नसतातच मुळी. ते तिथे सेवा रुजू करायला आलेले आपल्यासारखेच लोक असतात. डॉक्टरही तसेच. मुंबईत लाखालाखांनी फिया घेणारे डॉक्टर इथे फुकट ऑपरेशनं करतात..’’
 
महोदय अथवा मोहतरमा, ही कशाला- भारतवर्षातली सगळीच हॉस्पिटलं अशीच शांत, अदबशीर सेवा देणारी आणि योग्य दर आकारणारी असली पाहिजेत, असं नाही का वाटत तुम्हाला? हे जे कोणी सेवेकरी असतात, ते नंतर आपापल्या गावी परतल्यानंतर आपापल्या कामाधंद्यात ही ऋजुता आणि समाजभान दाखवत असतील, तर सत्संगाचा फायदा!
 
जनमानसावर गारुड करणारा सामूहिक शिस्तीचा महाराष्ट्रातला आविष्कार म्हणजे पंढरीची वारी. या वारीनं भल्याभल्यांना वेड लावलं.
 
कारण, एक तर महासमन्वयच असलेला श्री विठ्ठल हा फारच सोयीचा देव! तो कोणत्याही पंथाचा नाही, कोणत्याही देवाचा ठोस अवतार नाही. तो नवसाबिवसाला पावण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळे नवस फेडण्यासाठी उलट चालत जाणे, लोटांगणं घालणं, अंगात सुया खुपसून घेणं, नारळ फोडत जाणं, कोंबडं-बकरं कापणं असले कायदेशीर मान्यताप्राप्त अंधश्रद्धेचे धंदे त्याच्यापुढे चालत नाहीत. त्यामुळे पुरोगाम्यांची केवढी मोठी सोय. पुरोगामित्वाचं सोवळं जराही न फिटू देता विठ्ठलावर श्रद्धा ठेवता येते, त्याला आईही म्हणता येतं, बॉयफ्रेंडही मानता येतं आणि वर ‘एक वारी सोडल्यास’ नास्तिकही राहता येतं..यंव रे गब्रू!
 
संतमंडळींमध्ये साईबाबा जसे ना हिंदू ना मुसलमान- त्यामुळे सर्वधर्मीयांचे बाबा बनले, तसा हा विट्ठल जातिपातींमध्ये शकलित होऊन गेलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वाचा देव झाला.. त्यात काव्यगुणांमुळे आणि बंडखोरीमुळे पुरोगाम्यांना प्रिय असलेल्या संतांचीही ही माऊली.. संत अठरापगड जातींचे.. त्यामुळे माऊली आणि माऊलींची वारी यांतून समतेचा, सहिष्णुतेचा संदेश दिला जातो, असाही जावईशोध लागला. प्रत्यक्षात संतांना त्यांच्या आयुष्यकाळात जातवास्तवाचे आणि आनुषंगिक पंक्तीप्रपंचाचे केवढे भीषण चटके खावे लागले, हे त्यांच्या- साक्षात विठूमाऊलीला दूषणं देणाऱ्या- काव्यातूनही कळू शकतं. वारीमध्ये जाती आणि मठांच्या मानापमानांची केवढी मोठी उतरंड आहे हे कोणत्या पालखीचा कोणता मान वगैरे कर्मकांडांमधूनही स्पष्ट होतंच. शिवाय वारीत सगळे समान पातळीवर येतात, असं घटकाभर मान्य केलं, तर त्या समतेच्या विचाराचं घरी गेल्यावर काय लोणचं घालून फडताळात ठेवतात की काय पुढच्या वारीला बाहेर काढायला?.. वारीतून खरोखरच जात्यंत घडता, तर आतापर्यंत महाराष्ट्र संपूर्णपणे जातिमुक्त झाला असता.
 
वारकरी हे सहिष्णुतेचे पुतळे, हा समज आनंद यादवांच्या साहित्य संमेलनाध्यक्षपदावरून या समाजानं घेतलेल्या टोकाच्या उग्र आणि हिंस्त्र भूमिकेतून कधीच खोडून निघालेला आहे. तुकारामाचं नाव घेणारे हे आधुनिक मंबाजीच. यांना ‘नाठाळांचे माथा हाणू काठी’ वगैरे आपल्या सोयीचे अभंग सोयीने वापरता येतात, एवढंच काय ते खरं. नाठाळ कोण ते ठरवणारे हेच. वारक-यांचे देहधर्म अनावर होऊन कोणत्या वस्त्यांमध्ये गर्दी वाढते, याचा साद्यंत वृत्तांत देणा-या वर्तमानपत्रावर हल्ला चढवणारे स्वत:ला वारकरीच म्हणवत होते. त्याने कधी कोणत्या संप्रदायाचा अवमान झाला नाही, हा मोठा जोकच.
 
म्हणजे, वर्षानुवर्षाची परंपरा म्हणून अनवाणी पावलांनी सहभागी होणारा, तुळशीमाळ गळा आणि लल्लाटी टिळा एवढीच ओळखीची खूण ठेवून निर्गुण निराकाराशी भावतल्लीन होणारा, विठ्ठल मंदिराच्या कळसालाच डोळेभरून पाहून त्यात विठुमाऊलीच्या दर्शनाचं सुख मानणारा साधाभोळा, खराखुरा वारकरी पंढरीच्या वारीत असतच नाही का?..
 
असतो की. तो नसता तर वारी टिकली असती का? वारीची हेलिकॉप्टरांनी सवारी करणारे आणि कडेकडेने शिष्ट, र्निजतुक गाडय़ांमधून येऊनजाऊन हजेरी लावणारे इव्हेंटबहाद्दर शिरले आहेत. पण, खरी वारी त्यांची नाही. खरी वारी ख-या वारक-यांचीच आहे..
 
प्रॉब्लेम इतकाच आहे की शेकडो वर्षात हौशे-गवशे-नवशे वारकरी आणि सेवेकरी हे वारीपुरतेच वारकरी आणि सेवेकरी राहिले आहेत.
 
वारीत डॉक्टरांची टीम मनोभावे मोफत औषधोपचार करते.. वारकरी ज्या ग्रामीण भागांतून येतात, तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीही डॉक्टर मिळत नाहीत. ग्रामीण भागात इंटर्नशिप करण्याऐवजी दंड भरण्याकडे शिकाऊ डॉक्टरांचा कल असतो..
 
वारी सुकर व्हावी यासाठी सरकारी अधिका-यांची टीम अहोरात्र राबत असते.. हेच अधिकारी वारीनंतर त्याच वारकरी शेतक-याला सातबाराच्या नकलेसाठी खेटे घालून वहाणा झिजवायला लावतात..
 
वारीत हजारो जणांची पोटं भरतील, अशी सुग्रास अन्नाची अन्नछत्र झडत असतात.. त्याच महाराष्ट्रात मेळघाटातली कुपोषित बालकं हा दरसालचा बातमीचा विषय असतो..
 
माणसांना माणसांशी माणसांप्रमाणे वागण्यासाठी, संवेदनशील राहण्यासाठी वारीसारखी निमित्तं का लागावीत?
 
या प्रश्नाचं उत्तर तर साक्षात विठूमाऊलीही देऊ शकणार नाही.


(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, २६ जून, २०११)

3 comments:

  1. थेट. स्पष्ट. पण अरण्यरूदन.

    ReplyDelete
  2. छान 👌 नेमकं आणि बिनधास्त 👍

    ReplyDelete