Tuesday, June 14, 2011

छचोरीस्तानचे चौधरी

‘प्यार का पंचनामा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ‘लाइफ सही है, टेन्शन नही है’ या गाण्यात ‘छचोरीस्तानके चौधरी है’ अशी ओळ आहे ती जगातल्या सगळय़ाच छचोरीस्तानच्या चौधरींना लागू होते.. 

छचोरीस्तानचे चौधरीकशानेही खूष होतात.. एखाद्याच्या मृत्यूनेही.
 
प्रत्येकाला इतरांपेक्षा वेगळी मतं असण्याचा अधिकार असतो, हेच छचोरीस्तानच्या चौधरींना मान्य नाही.. चौधरी हे आपले अनभिषिक्त सम्राट आहेतया एका मताव्यतिरिक्त आणखी काही मत आपल्याला किंवा अन्य कुणाला असायची गरजच काय, असा त्यांच्या अनुयायांचा खाक्या. त्यामुळे चौधरींपेक्षा वेगळं मत मांडणारा प्रत्येकजण चौधरींचा आणि त्यांच्या अनुयायांचा शत्रू होतो आणि शत्रूला क्षमा नाही.. मरणोपरांतही नाही.
 
खरंतर मरणानंतर सर्व वैरभावना संपतात, असं छचोरीस्तानच्या धर्मात म्हटलेलं आहे. चौधरींना आणि त्यांच्या पिलावळीला या तथाकथित धर्माचा प्रखर, जाज्वल्य वगैरे अभिमान आहे. तरीही ते आपल्याच धर्मातल्या सहिष्णुता वगैरे गैरसोयीच्या गोष्टी बिनधास्त फाटय़ावर मारू शकतात.. कारण, धर्मावर बोलण्याचा, त्यात हवं तसं मॉडिफिकेशन करण्याचा, त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार त्यांच्या स्वाधीन आहे. त्यामुळेच, एखादा माणूस मरण पावल्यानंतर त्याच्याबद्दल असेल त्याच्या क्षेत्रात मोठा, झालं असेल त्या क्षेत्राचं नुकसान, आम्हाला काय त्याच्या मोठेपणाच्या क्षेत्रातलं कळत बिळत नाहीअसं म्हणू शकतात. तुम्हाला ज्यातलं कळत नाही, त्याबद्दल बोललंच पाहिजे असं काही बंधन तुमच्यावर नाही, असं त्यांना कुणी सांगत नाही. तेही मन मानेल तसं मनात येईल त्या विषयावर बरळत राहतात. लोक ऐकत राहतात. टाळय़ा पिटतात. खूपच पाचकळ बोलले, तर शिटय़ाही वाजवतात..
 
छचोरीस्तानची नावापासूनच गंमत आहे.
 
छचोरीस्तान म्हणजे छचोरांचा देश.
 
आता इतकं अवहेलनाकारक नाव आपणहून कोणी आपल्या देशाला ठेवेल का?
 
पण या देशानं ते ठेवून घेतलंय आणि ते सार्थ करण्याची चढाओढ सुरू असते इथे.
 
या देशाची ही ओळख फार अलीकडची आहे. पण, हे इथं कुणाला ठाऊक नाही फारसं. ज्याला त्याला वाटतं की आपल्या देशातली सध्याची प्रत्येक गोष्ट पुराणकाळापासूनची आहे.. इतर देशांकडून आयात केलेल्या विमानं, अणुस्फोट, टीव्ही, मोबाइल वगैरे साधनांचे शोधही यांच्यातल्या प्रज्ञावंतांना त्यांच्या जीर्णशीर्ण पोथ्यांमध्ये लागतात.. यांच्या इतक्या प्रगत पूर्वजांनी हे सगळे शोध त्या काळातल्या कम्प्यूटरवर का नाही नोंदवून ठेवले, पाठांतरं का घटवून घेतली आणि भूर्जपत्रंच का खरडली, असा बेसिक प्रश्नही कधी यांच्या टाळक्यात येत नाही. पुरातनकाळापासून तसंच असलेलं इथं काही असेल, तर तो म्हणजे या छचोरांचा मेंदू.. त्यात एका सुरकुतीचीही भर पडलेली नाही.
 कधीतरी कुणीतरी या प्रचंड भूप्रदेशातल्या लोकांना कुचेष्टेनं छचोर म्हटलं. अनेक ओळखींच्या, जीवनपद्धतींच्या, देवदेवतांच्या, रूढीपरंपरांच्या वैविध्याचं लेणं लाभलेल्या आणि त्या बहुरंगी पटाच्या रूपात खुलून दिसणाऱ्या या देशाला एकवचनी, एकबाणी, एकपाठी, एकसाची, एकरंगी, एकचालकानुवर्ती म्हणजेच थोडक्यात महाबोअरिंग एकसपाट देश करायला घेतलेल्या त्या वेळच्या चौधरींना ही एकच एक ओळख भयंकर भावली आणि त्यांनी या देशाचा ताबडतोबीनं छचोरीस्तान करून टाकला.
एकेकाळी हा समाज मुक्त होता, जिथे हवा तिथे छान उन्मुक्तही होता.
 
निसर्गातच देव पाहात होता, नैसर्गिक प्रेरणांचे गंड बाळगत नव्हता आणि त्यांच्या दमनाचे भलते प्रयोगकरत नव्हता.
 
या समाजाला नागडेपणाचा सोस नव्हता तसंच नग्नतेचं भय नव्हतं.
 
रसरशीत जीवनासक्ती होती म्हणून निकोप सौंदर्यासक्तीही होती.
 
हे सगळं बदललं ऐतखाऊंच्या टोळय़ा सोकावल्यानंतर. हे सोकाजीनाना धर्मकर्मकांडाचा त्रिलोकव्यापी बाष्कळपणा पसरवू लागले तसतसा हा समाज दिवसेंदिवस आक्रसू लागला.. आचारविचारांचं स्वातंत्र्य, एकमेकांचा जीव न घुसमटवणारी सर्व संबंधांची मोकळीक म्हणजे छचोरपणा अशी समजूत करून दिली जाऊ लागली. भाटांनी रचलेल्या अतिशयोक्तिपूर्ण कथा-कादंबऱ्यांमधल्या पात्रांचे देव झाले. माणसं जगण्याचा कमी आणि मरण्याचा विचार जास्त करू लागली.. भौतिकातली गंमत विसरून पारलौकिकाचे टाळ कुटू लागली. स्वकष्टानं, बुद्धिमत्तेनं आणि इभ्रतीनं सर्व सुखांचा स्वर्ग निर्माण करण्याची धमक संपली आणि माणसं मरणानंतरच्या काल्पनिक स्वर्गासाठी भंपक पुण्यसंचय करू लागली.. आपल्याला या सगळय़ा उतरंडीत गाडून, कर्मकांडांना जुंपून कोणतंही उत्पादक काम न करणारा एक वर्ग इथेच स्वर्गसुख भोगतोय, याचा विचार करण्याइतपतही मेंदू चालेनासा झाला इथल्या बहुजनांचा. भाकडकथांच्या आणि जडजंबाल शब्दजंजाळाच्या फुटकळ पोथ्यांचे धर्मग्रंथ झाले आणि छचोरीस्तानच्या छचोरांनी बुद्धीची सगळी कवाडं घट्ट बंद करून घेतली..
 ..त्यामुळे, आज छचोरीस्तानच्या छचोरांना त्यांच्याच मोकळय़ाढाकळय़ा सुंदर परंपरा माहिती नाहीत. सगळय़ा मोहक भावना-वासनांचं विकृत दमन करून करून नजर आणि बुद्धी पुरती विकृत झालीये यांची. कलाजाणिवा बथ्थड आणि बटबटीत. सौंदर्याचा संस्कार नाही, कलेची जाण नाही, अभिजाततेचा स्पर्श नाही, जीवनोन्मुख जिज्ञासेचं वारंही कधी शिवलेलं नाही, त्यामुळे नवोन्मेषांचे बहर स्वीकारणारा स्वागतशील उमदेपणाही नाही.. आहे तो फक्त करवादी किरकिरा करंटेपणा..
या करंटेपणाचाही म्हणे यांना गर्वच आहे..
 ..गर्वबिर्व सोपा असतो.. विचार अवघड.. आणि जोपर्यंत माणसं विचार करत नाहीत, तोपर्यंतच आपलं लाइफ सही है, टेन्शन नही हैयाची कल्पना छचोरीस्तानच्या चौधरींना आहे. त्यामुळे सगळय़ांच्या वतीने सगळा विचार तेच करतात. बहुसंख्य छचोरांनी स्वेच्छेनं तो अधिकार यांना बहाल केलाय, ही आणखी मोठी गंमत.
त्यामुळे हे उचलून धरतात ते योग्य, हे नाकारतात ते अयोग्य.
 
हे म्हणतात ते श्लील, हे नाकारतात ते अश्लील.
 
हे सांगतात, तो धर्म आणि हे सांगतात तो धर्मद्रोह.
 
हे सांगतात, अमक्याच्या मागे कुत्र्यासारखे धावा.
 
छचोर धावतात.
 
लचके तोडा.
 
कचाकच तोडतात.
 
पुन्हा हा आपल्या गल्लीत दिसता कामा नये.
 
तो कायमचा परागंदा.. मरेपर्यंत.
 
दो गज जमीं भी न मिली कू-ए-यार में..
 
छचोरीस्तानचे शूरवीर मातृभूमीभक्त खूष..
 
तिला नागवं रेखाटणाऱ्याला पळवून लावलं..
 
अरे पण मातृभूमीला रोज नागवं करणा-याचं काय?..
 
काही नाही.
 
आपल्या थोर माता शारदेला विनाअनुदानित बाजारात बसवणा-यांचं काय?..
 
काही नाही.
 
तुमच्याकडे आधीपासून परंपरेनं रेखाटल्या जाणाऱ्या नग्नमूर्तीचं काय?..
 
काही नाही.
 
खरंतर यांच्या देशाचं हे नाव फारच सौम्य आहे..
 ते मठ्ठीस्तान असायला पाहिजे.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १२ जून, २०११)

2 comments:

  1. "या समाजाला नागडेपणाचा सोस नव्हता तसंच नग्नतेचं भय नव्हतं."
    सॉल्लिड वाक्य!
    तशी तुमच्या लेखातली एकेक वाक्यं अशी काढून संगता येतील पण ही लाईन खासच!!

    ReplyDelete
  2. चांगलंच शेकून काढलंय!
    आणि "सोकाजीनाना" धर्मकर्मकांडाचा "त्रिलोक"व्यापी बाष्कळपणा पसरवू लागले, ही कोटी भयंकर आवडली.. :)

    ReplyDelete