Wednesday, June 15, 2011

बापू की ऐनक

पूर्वी शालेय पुस्तकांमध्ये ‘मामा की ऐनक’ नावाचा धडा होता. मामांचा चष्मा हरवतो. ते घरभर चष्मा शोधतात. तो कोठेही सापडत नाही. शेवटी त्यांच्या कपाळावरच सापडतो. ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ ही म्हण सिद्ध करणारी ही कथा होती. सध्या वर्तमानपत्रांमध्ये ‘बापू की ऐनक’ गाजते आहे. वर्ध्याच्या आश्रमातून महात्मा गांधीजींचा चष्मा हरवल्याच्या बातमीने देशात खळबळ उडवून दिली आहे. ही बातमी आणि मंगळावर गांधीजींचा ‘चेहरा’ दिसत असल्याची बातमी एकाच सुमारास यावी, हा विलक्षण योगायोग. मंगळावर एका ठिकाणच्या टेकडय़ांच्या रचनेतून मानवी चेह-याचा भास होतो. हा चेहरा गांधीजींसारखा आहे, असा त्याचा ‘शोध’ लावणा-या हौशी इटालियन खगोलप्रेमीचा दावा आहे. गंमत म्हणजे, गांधीजींच्या त्या चेह-यावरही ‘ऐनक’ नाही. त्यामुळे, चष्मा हरवल्यामुळे गांधीजी चुकून पृथ्वीऐवजी मंगळावर जाऊन पोहोचले असावेत, असा कयास करायला हरकत नाही. वर्ध्याच्या आश्रमातून गांधीजींचा चष्मा चार महिन्यांपूर्वीच हरवलेला असताना त्याची बातमी आता बाहेर आली आहे. यात फारसे आश्चर्य नाही. या बातमीमध्ये रस कोणाला असणार? गांधींच्या देशात गांधींचा संबंध आता नोटेपुरताच राहिला आहे. ते कोरे करकरीत ‘गांधी’ हातात असतील, तर गांधीजीही नवनवीन फॅशनचे हवे तेवढे चष्मे घेऊ शकतील, इतका त्या ‘गांधीं’चा करिश्मा आहे. प्रतिगांधी होऊन देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू पाहणा-या आधुनिक समाजसेवकांनी गांधीजींचा चष्मा काही दिवस उसना घेतला असेल का, अशी एक शंका आहे. मात्र या आंदोलनांचे उथळ स्वरूप पाहता एकाकडेही ना गांधीजींची दृष्टी आहे ना आपल्या ध्येयावर केंद्रित लक्ष- त्यामुळे येथे चष्मा सापडणे मुश्किल दिसते. सर्वत्र फोफावलेला भ्रष्टाचार, पराकोटीचा चंगळवाद, ग्रामीण भारताची धूळदाण, गरीबांचे हाल, श्रीमंत मालामाल, धार्मिक कट्टरतेला ऊत असे आधुनिक भारताचे भेसूर दर्शन सतत होत राहिल्याने बापूंच्या मेंदूमध्ये ‘केमिकल लोच्या’ होऊन त्यांनी स्वेच्छेने ऐनक उतरवून ठेवून पृथ्वीपासून दूर, मंगळावर प्रयाण तर केले नसेल ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. मात्र, यातील काहीही घडले नसेल आणि एखाद्या चोरटय़ाने गांधीजींचा चष्मा चोरून नेला असेल, तरी तो काही दिवसांत स्वत:हून परत आणून ठेवेल; हा चष्मा घातल्यामुळे त्याचे हृदयपरिवर्तन होईल म्हणून नव्हे- तर, बापूंच्या नजरेतून भारताकडे पाहिल्यानंतर जे दिसेल, त्याचा चटका सहन करण्यासाठीही बापूंचेच डोळे हवेत, म्हणून.

(प्रहार, १५ जून, २०११)
 

No comments:

Post a Comment