Tuesday, April 29, 2014

महाराष्ट्राचा (वि)चित्र रथ!

सांगण्यास अतिशय संकोच होतो की आमचे परंमित्र आणि व्यवसायबंधू याने की फेलो जरन्यॅलिस्ट (कंपोझिटर, कृपया `फेलो'चे यलो करू नका) आणि जानेमाने स्तंभलेखक (ओवा आणा रे कुणीतरी) जै की ब्रिटिश नंदी यांजप्रमाणे आमचाही मंत्रालयात चांगला राबता आहे. त्यांच्याप्रमाणे आम्ही दर कॉलमातून ढोल पिटत नाही, पण मंत्री-सचिवांकडे आमचीही चांगली उठबस आहे. मध्यंतरी मंत्रालयातल्या भरगच्च उद्वाहनात म्हणजे लिफ्टमध्ये अनवधानाने एका पुरंध्रीला धक्का लागला (कंपोझिटर, चुकून इकडचे शब्द तिकडे आणू नका) तेव्हा जनसंमर्दाने आम्हाला ज्या उठाबशा काढायला लावल्या होत्या, त्या वेगळय़ा. ही उठबस वेगळी. मंत्रालयाच्या कोणत्या मजल्यावर कोणत्या केबिनीत खुट्ट वाजले, हे आम्हाला बसल्याजागी कळते. अनेकदा आम्ही त्याच जागी बसलेले असून त्या खुट्ट किंवा अन्य आवाजाचे जनकही आम्हीच असतो, ते सोडा...
... तर एक दिवशी असेच खुट्ट वाजले आणि आम्ही दचकून जागे झालो, तेव्हा लक्षात आलं की आम्ही एका सचिवमहोदयांच्या केबिनीत आहोत. एका टेबलामागच्या खुर्चीवर त्यांच्या आगमनाची वाट पाहात बसलो असताना त्याच टेबलावर एकामागोमाग एक फायली येत गेल्या आणि दुपारची वेळ असल्याने आम्हीही खुर्चीत डावीकडे वळून अंमळ डोळे मिटले. पंख्याच्या घरघरीमध्ये आमचा घोरण्याचा आवाज दडून गेला असावा. कारण, टेबलावर फायली आदळण्याच्या आवाजाने जेव्हा जाग आली, तेव्हा एक अधिकारी महोदय, ``व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे की काय, पंखा मध्येच घरघरतो, मध्येच घरघर थांबते,'' असं म्हणाल्याचं कानी आलं.  आम्ही सावध होऊन चर्चा ऐकू लागलो.
``...तर विषय रथाचा आहे,'' केंद्रेसाहेब म्हणाले.
आमच्याप्रमाणेच वाट पाहता पाहता एका गठ्ठय़ाच्या आडोशामागे डुलकी लागलेले दुसरे अधिकारी खडबडून जागे होत म्हणाले, ``अरे तिच्या, एवढा वेळ झोपलो मी! युतीचं सरकार आलं पण?''
``अहो, हेंद्रे उठा आता!'' केंद्रे म्हणाले, ``तरी आम्ही मघापासून विचार करतोय की पंखा इतका कसा घरघरायला लागलाय आज.''
``म्हणजे दादा-बाबा आहेत ना अजून?'' हेंद्रेंनी विचारलं.
``हो हो आहेत अजून आणि त्यांनी आपल्यावर बाबापुता करण्याची वेळ आणलीये'', शेंद्रे उत्तरले.
इथून पुढे या अधिकार्यांचा जो संवाद झाला, तो आम्ही पदरचं तिखटमीठ न लावता देतो आहोत.
हेंद्रे (ओशाळून हसत) : सॉरी हं, पण, रथ म्हटलं की आम्हाला कमळच आठवतं. त्यांचा कॉपीराइट आहे. पण, आपल्या दादा-बाबांनी कसला रथ काढायचं ठरवलंय?
शेंद्रे : अहो, प्रजासत्ताक दिन आहे ना?...
हेंद्रे : हो का, मग चला झेंडावंदनाला...
केंद्रे (वैतागून) : सदू, तांब्याभर पाणी घेऊन ये साहेबांच्या तोंडावर मारायला आणि एक कडक चहा पण आण.
हेंद्रे : विदाउट शुगर. साखर वर्ज्य आहे मला.
बेंद्रे (कपाळावर हात मारून) : तरी मी तुम्हाला सांगत होतो केंद्रेसाहेब, हे मीटिंगला असतील तर पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत रथ तयार व्हायचा नाही.
केंद्रे (सबुरीच्या स्वरात) : गोंधळ नको, ऐका. प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्रातर्फे संचलनात जो चित्ररथ पाठवायचाय, त्याच्या आयडिएशनसाठी आपण जमलोय. मोठे साहेब म्हणाले, जरा क्रिएटिव्ह डोकं असलेले चांगले अधिकारी घ्या. चर्चा करा. घुसळण करा. काही कल्पनांवर चर्चा करा आणि रथाची अंतिम कल्पना ठरवा.
शेंद्रे : पण, कॉन्ट्रक्ट कोणत्या बिल्डरला दय़ायचंय?
बेंद्रे : अहो, इथे बिल्डरचा संबंध येतो कुठे? तुम्हाला जिथे तिथे बिल्डर दिसतात... यांच्याकडे रथ बनवायला दिला तर सरळ आदर्श सोसायटी उभारून मोकळे होतील...
शेंद्रे : आणि तुम्ही काय कॅम्पा कोला उभारणार? अहो, रथ म्हणजे एक प्रकारचं बांधकामच नाही का? म्हणून विचारलं. आपल्याकडे बिल्डरशिवाय काही होतं का?
हेंद्रे : काळ कुठला आलाय शेंद्रे आणि बोलताय काय? इथे जागोजाग स्मोक डिटेक्टरसारखे बिल्डर डिटेक्टर बसवलेत आपल्या इमारतीत. वेषांतर करून आला बिल्डर तरी पकडतात बाबा आणि अधिकार्यांची चम्पी होते. परवा एक बिल्डर आमदाराच्या वेषात आला, तेव्हाही डिटेक्टरने बरोब्बर पकडला त्याला. नशीब तो बिल्डर आमदार निघाला म्हणून.
बेंद्रे : केंद्रेसाहेब, मुळात ही सगळी प्रक्रियाच उलटी चाललेली आहे. मला सांस्कृतिक खात्याचा कार्यानुभव आहे म्हणून सांगतो. या सगळय़ा भानगडीत आपण पडायचं कारण नाही. सांस्कृतिक मंत्र्यांच्या (जीभ चावून) अं म्हणजे त्या खात्याच्या अनेक उपक्रमांप्रमाणे हा उपक्रम अनौपचारिकरित्याच होऊन जातो. ते एखादय़ा ओळखीतल्या कलादिग्दर्शकाला सांगतात. तो ठरल्या दिवशी दिल्लीत रथ आणून हजर करतो आणि साहेबापुढे (पुन्हा जीभ चावतात)... कल्पना वगैरे लढवणं हे आपलं काम आहे का? इथे दिवसाचा गल्ला मोजायला फुरसत नाही...
केंद्रे : हे बघा ऑर्डर इज ऑर्डर. अहो, चहा पिता पिता थोडय़ा गप्पा मारल्या, दोनपाच कल्पना मोठय़ा साहेबांपुढे मांडल्या की तुम्ही पुन्हा मोजायला मोकळे.
शेंद्रे : ओके ओके. उगाच वेळ वाया घालवायला नको. साहेब, मला सांगा, चित्ररथ म्हणजे नेमकं काय असतं?
केंद्रे : अहो एक मोठा रथ असतो. त्यावर त्या राज्याचं वैशिष्टय़ किंवा त्या राज्याने केलेली खास कामगिरी असं काहीतरी दाखवायचं असतं.
शेंद्रे (उत्साहात) : मग सोप्पं आहे. आपण स्कायवॉक दाखवूयात. खालून वाहता रस्ता, वाहतुकीची कोंडी आणि वर निर्मनुष्य स्कायवॉक. तद्दन बोगस आणि निरुपयोगी कामांवर कसा खर्च होतो आपल्या राज्यात, ते छान दिसेल त्यातून.
हेंद्रे : तुमची आयडिया चांगली आहे शेंद्रे, पण हे काही फक्त आपल्याच राज्याचं वैशिष्टय़ असू शकत नाही. इथे आपल्या राज्याची खासियत हवी, नाही का केंद्रेसाहेब? (त्यांचा रुकार घेतल्यानंतर डोकं खाजवतात आणि एकदम कल्पना चमकून) आयडिया! आपण महाराष्ट्राची खास ओळख म्हणून टोल नाका दाखवूयात!
बाकीचे (आश्चर्याने) : टोल नाका?
हेंद्रे : हो हो, टोलनाका. अहो हीच तर महाराष्ट्राची आजची ओळख आहे. मुंबईहून कोल्हापूरला जायला जेवढय़ा रकमेचं डिझेल भरावं लागतं, तेवढय़ा रकमेचा टोल भरायला लागतो. एक रस्ता असा नाही, ज्याच्यावर टोल नाही. टोलची रक्कम काय, कशाबद्दल, किती दिवस भरायचा, कमी कधी होणार, संपणार कधी, टोलचे पैसे कुणाकडे जातात, कसला कुणाला पत्ता नाही. किती प्रातिनिधीक आहे हे चित्र.
केंद्रे : आयडिया चांगली आहे तुमची. पण, यात काही नाटय़ नाही. आली गाडी भरला टोल, गेली पुढे. यापेक्षा वेगळं काय दाखवणार आपण?
हेंद्रे : अहो, मस्त गाणं टाकता येईल, नाचही बसवता येईल, `मी टोलकर, टोलकर, टोलकर रस्त्याचा राजा...'
बेंद्रे : एक मॉडिफिकेशन करता येईल? आपण लोक टोलनाक्याची नासधूस करताना दाखवले तर?
शेंद्रे : मग तो कोल्हापूरचा चित्ररथ होईल, सगळय़ा महाराष्ट्राचा होणार नाही.
हेंद्रे : पण मी काय म्हणतो, टोलनाका गोव्यातला दाखवला तर? महाराष्ट्रातल्या टोलकरांचे मित्र मंत्रीपुत्र गोव्यातल्या टोलला कसा बाणेदारपणे विरोध करतात, हे दाखवता येईल त्यातून.
केंद्रे (गालात हसून) : पुढची पोस्टिंग सिंधुदुर्गात की काय हेंद्रे?
सगळे हसतात.
बेंद्रे : मला वाटतं आपण एखादय़ा धरणाचा देखावा दाखवला पाहिजे स्पेशल इफेक्ट्सच्या साहय़ाने.
शेंद्रे : अहो, पण धरणं तर देशात सगळीकडे आहेत...
बेंद्रे : ती भरलेली. रिकामी धरणं हे आपलं वैशिष्टय़ नाही का? धरणाच्या परिसरातल्या आयाबाया घागरभर पाण्यासाठी मैलोन्मैल चालतायत आणि भलतीकडचेच ऊस राक्षसी तहानेने पाणी पिऊन मस्त डोलतायत, असं विरोधाभासी चित्रही दाखवता येईल.
केंद्रे : तुम्हाला प्रतिनियुक्तीवर केंद्रात जायचंय बेंद्रे की रजेवर जाऊन सिनेमा काढायचाय? आम्हाला इथेच नोकरी करायचीये हो! ती टिकेल अशी सूचना करा.
हास्यस्फोट.
हेंद्रे : पण, काही म्हणा. यांची सूचना चांगली होती. धरणाशेजारी पुतळाही उभा करता आला असता यांच्या दादांचा. (डोळा मारून पुढची एक नंबरची ऍक्शन करतात. प्रचंड हास्यस्फोट होतो.)
बेंद्रे : केंद्रेसाहेब, मघापासून तुम्ही फक्त आमचं ऐकताय. तुमच्या डोक्यातही काही आयडिया असेलच की!
केंद्रे : मला वाटतं, आपण मंत्रालयाचा मेकओव्हर अशी थीम घ्यावी.
हेंद्रे : म्हणजे मंत्रालयाच्या इमारतीसमोर गळय़ात गळे घातलेले `मफलर-बिल्डर भाई भाई' दाखवता येतील, नाही का?
शेंद्रे : छे हो, लाइव्ह जळणारं मंत्रालय दाखवता येईल... लोकांनाही पाहून जाम आनंद होईल.
बेंद्रे : मला वाटतं, केंद्रेसाहेबांना काहीतरी वेगळं म्हणायचंय.
केंद्रेo ः बरोबर ओळखलंत. तो मेकओव्हर नाही. नवे मुख्यमंत्री आल्यापासूनचा मेकओव्हर. भ्रष्टाचाराला बसलेला आळा, बिल्डरांची झालेली गच्छंति, (उरलेले अधिकारी एकमेकांना डोळा मारत `पीएमओ, पीएमओ' असं म्हणतायत) सगळा स्वच्छ कारभार, चुकीच्या योजना मंजूर न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार या सगळय़ाचं चित्र दाखवता येऊ शकेल रथावर...
...``त्यासाठी रथावर एक बादली दाखवा मोठी दहा फुटी. साबणाच्या फेसाने ओसंडणारी,'' कोणीही अधिकारी काही बोलण्याच्या आधी भान सुटून आम्हीच हे बोलत फायलींच्या ढिगार्यामागून बाहेर आलो, ``त्या बादलीत सतत आपले कपडे बुचकळून, अहाहा, किती स्वच्छ, किती सफेद असं म्हणणारे, अधूनमधून उठून अंगातल्या कपडय़ांवर डाग तर नाही ना, हे पाहणारे मुख्यमंत्री दाखवा आणि कडेला साचलेला फायलींचा डोंगर दाखवा, त्या डोंगराखाली चेचलेली आणि केकाटणारी मराठी जनताही दाखवा, म्हणजे रथ परिपूर्ण होईल...''
...इथून पुढे काय झालं ते नेमकं आठवत नाही...
...पण, सध्या आमच्या उठबशीतला बसण्याचा भाग काही काळापुरता स्थगित झालेला आहे... सर्वत्र उभ्यानेच फिरावे लागते आहे... खासकरून मंत्रालयात.

No comments:

Post a Comment