Tuesday, April 29, 2014

मुंबईचं डेट्रॉइट

स्थळ : मुंबईतला एक रस्ता.
वेळ : रात्रीची.
(रस्त्यात एक पक्का मुंबईकर एकटाच नाचतो आहे. मागे कसलाही आवाज नाहीये. पण हा बेभान होऊन टपोरी डान्स करतो आहे. कच्चा मुंबईकर येतो आणि हा अजब प्रकार पाहून थबकतो, त्याच्याभोवती गोलगोल फिरतो. पण, प.मुं.ला त्याचा पत्ताही लागत नाही. तो आपला मस्त नाचतोच आहे. क.मुं. बारकाईने प.मुं.च्या कानांचं निरीक्षण करतो. आत इयरफोनही दिसत नाहीत. मग तो आणखी चकित होतो. शेवटी न राहवून तो प.मुं.च्या खांदय़ावर हाताने थापटत विचारतो.)
क.मुं. (थापटून) : हॅलो, एक्स्क्यूज मी... ये आप क्या कर रहे है...
प.मुं. (वैतागून, उर्मट स्वरात) : हिला रहा हूँ... अपना बदन, तुमको कोई प्रॉब्लेम... तुम्हारा हिलता होगा तो तुम भी हिलाओ... बदन!
क.मुं. (`अजि म्या दादा कोंडके पाहिले' अशा भावनेने लाजून लालबुंद होत) : कुछ भी क्या बोलता है? मैने सीधे सीधे पूछा ना? सीधा जवाब दो ना भाई.
प.मुं. (संताप आवरत) : आयला या भय्यांच्या! अरे, दिखता नहीं क्या, मैं नाच रहा हूँ...
क.मुं. (सात्विक संतापाने) : ते तर मलाही दिसतंय, पण म्युझिक बिझिक ऐकायला येत नाहीये म्हणून विचारलं. उगाच भय्या म्हणून कशाला हिणवतोस?
प.मुं. (खास भगवा भूमिपुत्रस्टायलीत) : महाराष्ट्रात राहून मराठी असून महाराष्ट्राच्या राजधानीत एका मराठी माणसाशी हिंदीत बोलायला सुरुवात करतोस आणि वर भय्या का म्हणालो म्हणून विचारतोस?
क.मुं. (वरमून) : अरे वेडय़ा, त्यावरूनच तुला कळायला पाहिजे होतं की मी मराठी माणूस असणार. असो. आपण तरी काय करणार? आता सवय झालीये. तूही माझ्या हिंदी प्रश्नांना हिंदीतच उत्तरं दिलीस, त्यातूनच मला शंका आली की हा मराठी माणूस असणार.
प.मुं. : मित्रा, कोणत्याही दोन मराठी माणसांप्रमाणे भेटलं की भांडायचं, हा छंद सोडून देऊन मुद्दय़ावर येऊयात का? मी नाचतोय माझ्या मनातल्या म्युझिकवर.
क.मुं. (त्याच्याप्रमाणेच थेट मुद्दय़ावर येत) : का?
प.मुं. (अत्यंत अर्वाच्य शिव्या ओठांवर आल्या आहेत, पण देता येत नाहीत, असं तोंड करून) : कारण आता सव्वा दहा वाजले बाळा रात्रीचे! आमच्याच राज्यात, आमच्याच गल्लीत आमच्याच आनंदासाठी आम्हाला आवाज करण्याचीही परवानगी नाहीये आता रात्री दहाच्या नंतर. त्यामुळं असंच नाचायला लागतं गडय़ा दहानंतर... मनातल्या मनात. नाहीतर डेसिबल मोजून दंड करतात, तुरुंगात टाकतात, दम भरतात. एकीचं बल नसलं की डेसिबलही भारी पडतात आपल्याला.
क.मुं. : अहाहा! टाळीचं वाक्य (विशिष्ट प्रकारे टाळी वाजवतो). आपल्याला फारच आवडतं नाही टाळय़ा वाजवायला? ते जाऊदेत. मला एक सांग, मुळात तू नाच करावास इतका आनंद कसला झालाय तुला? खासगी कारण असेल तर सांगू नकोस...
प.मुं. (खिन्न आणि खटय़ाळ यांच्या अजब मिश्रणाचा चेहरा करत हसून) : खासगी? बंबईमे नया आयेला है क्या भाई? अरे डार्लिंग, इथे रात्री आपल्या बिछान्यात, आपल्याच बायकोला प्रेमाने जवळ घेऊन लाडाने तिच्या कानात कुजबुजलं, `हाय जानेमन' की शेजारच्या बिर्हाडातली भिंतीपलीकडे झोपलेली शेजारीण उत्तर देते, `काय म्हणताय भाऊजी? मोठय़ाने बोला, काही ऐकायला येत नाहीये.' लोकलमध्ये पाउण तास हात खाजवल्यानंतर खाली उतरलं की लक्षात येतं की तो हात दुसर्याचाच होता. इथे कुणाचं काय खासगी असणार बाबा! इथे सगळं सार्वजनिकच आहे गडय़ा. हगण्यापासून जगण्यापर्यंत.
क.मुं. : अरे, दुसरं टाळीचं वाक्य. कमाल आहे राव.
प. मुं. (कॉलर ताठ करत) : म्हणजे काय? मराठी माणूस आहे. अस्सल मुंबईकर आहे. भूमीपुत्र मुंबईकर आहे. लहानपणापासून, कळत नव्हतं तेव्हापासून शिवाजी पार्कावर विचारांचं सोनं लुटलंय दरवर्षी.
क. मुं. : तरीच!
प. मुं. : काय तरीच? काहीतरी उलटसुलट बोललास तर जीभ हासडून ठेवीन. आईभवानीच्या जगदंबेच्या...
क. मुं. : अरे थांब थांब थांब बाबा! माझं शर्ट फाटेल. 
प. मुं. (चक्रावून) : तुझं शर्ट फाटेल? माझ्या बोलण्याने?
क. मुं. : अरे, तू एकदम वीरश्रीपूर्ण बोलणार. त्याने माझी छाती फुगणार. गर्वाने, अभिमानाने. पण, शर्ट घातलंय ते शरीराच्या मापाचं. त्याला गर्वाचं माप कळत नाही. ताण बसला की ते फाटणार. म्हणून म्हटलं थांब. मला फक्त एकच सांग. मुंबईची आणि तिच्यात आपली, मराठी माणसांची अवस्था कशी आहे, हे तूच सांगतोयस. आजच्या या बकाल, भेसूर आणि बेसूर मुंबईमध्ये तुला आनंद साजरा करण्यासारखं काय सापडलं? का हा मुंबईत वर्षभर साजर्या होणार्या उत्सवांसारखाच उगाचच सार्वजनिक आनंद. कारण काय काही नाही, तरी सगळे नाचतायत मोठमोठय़ाने म्युझिक लावून.
प.मुं. : अरे गडय़ा, आनंद करण्यासारखं फारसं काही नसतं, तेव्हाच लोक सारखा सारखा आनंद करतात. विचार कर, आज मुंबईकर काय प्रकारचं आयुष्य जगतो. तो घर आणि ऑफिस एवढंच करत बसला, तर वेडा तरी होईल नाहीतर एकमेकांचे खून तरी पाडेल. त्यापेक्षा अमुक उत्सव, तमुक सप्ताह, अमुक सत्संग असा कशाकशात लोक जीव रमवतात, शक्य तेवढे घराच्या बाहेर राहतात. त्यानेच घरात शांतता राहते आणि मुंबईत सुव्यवस्था राहते.
क.मुं. : हे मात्र बरोबर. म्हणूनच मीही असा इकडे तिकडे चौकशा करत फिरतो. पण, तुला आनंद कसला झालाय, ते सांगितलंच नाहीस.
प.मुं. : अरे, मुंबईचा नवा डेव्हलपमेंट प्लॅन येणार. मुंबईला नव्या सुखसुविधा मिळणार. सर्वसामान्य मुंबईकराचं जगणं सुसहय़ होणार, याचा मला आनंद झालाय.  (क. मुं. त्याच्या तोंडाचा वास घेतो) काय रे ट्रफिक हवालदारासारखा वास कसला घेतोयस?
क. मुं. : काय पिऊन आलायस ते बघतोय... मुंबईला कसलीतरी सरकारी योजना मिळणार, प्लॅन मिळणार आणि तिच्यातून मुंबईचं भलं होणार, आपलं आयुष्य सुधारणार, असं वाटून नाच करणारा माणूस एकतर ठार वेडा तरी असणार नाहीतर हातभट्टी मारलेला तरी असणार. तू वेडा दिसत नाहीस. अरे, या मुंबईसारखी डेंजर सिटी दुसरी नाही. जो येईल त्याला नादी लावते आणि जो छन्छन् पैसा वाजवेल, त्याला डोळा घालते. इथे दिवसा अस्मितेच्या बाता मारणारे रात्री शेठजींचे बूट पुसतात आणि गोरगरिबांना फटकवणारे शूरवीर धनदांडग्यांपुढे शेपटय़ा घालतात. इथे कार्यकर्ते कार्य करत दहा बाय दहाच्या खोपटय़ात मरतात आणि नेत्यांचे गाव तिथे कोहिनूर उभे राहतात. इथे कोणत्या बॅगा उचलणार्यावर लक्ष्मीची कृपा होईल ते सांगता येत नाही आणि कोणत्या धनवंताच्या गाडीखाली फुटपाथवासियांना मोक्ष मिळेल, तेही सांगता येत नाही. इथे घर गमावण्याचं दुःख फक्त कॅम्पाकोलावासियांनाच होतं, खारचे गोळीबार रोडवाले दिवसाढवळय़ा देशोधडीला लागतात, तेव्हा एकही मेणबत्ती लागत नाही. बाकीचं सोड मित्रा, साला 26 जुलैचा पाऊसही सामान्य मुंबईकरांच्या जिवावर उठतो, पण दक्षिण मुंबईवर रिमझिमच पडत राहतो. अशा या बेईमान नगरीत सामान्य माणसाचं काहीतरी भलं होईल, असं स्वप्न पाहतोयस तू?
प.मुं. : काय करणार मित्रा! ही स्वप्नांची नगरी आहे. वास्तव असहय़ झालं की माणसाला स्वप्नांचाच आधार असतो. आता मेट्रो आली, मोनोरेल आली, रस्ते मोठे झाले, फ्लायओव्हर आले, लोकलच्या फेर्या वाढल्या, झोपडपट्टय़ांच्या जागी रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगी आल्या, सव्वादोनशे फुटांचे चारशे फूट झाले, तरी आपलं भलंच होणार ना रे मित्रा! तुका म्हणे त्यातल्या त्यात!
क.मुं. (भयंकर संताप दाबत) : तुका म्हणे त्यातल्या त्यात आणि सडून मरा आतल्या आत! गुलामांना कौतुक कसलं, तर बेडय़ांना चकचकीत पॉलिश करून मिळाल्याचं. अवघड आहे. मुंबईचं डेट्रॉइट होणार आहे डेट्रॉइट.
प.मुं. (अत्यंत आनंदाने) : अरे, काय सांगतोस काय! मग नाच ना गडय़ा माझ्याबरोबर. ये धतड ततड ततड ततड...
क.मुं. (नाच थांबवत) : डेट्रॉइट म्हणजे काय कळलं?
प.मुं. ( गोंधळून) : नाय बा! आपल्याला काय, मुंबईचं शांघाय करा, न्यू यॉर्क करा, डेट्रॉइट करा, सिंगापूर करा, सगळं सारखंच. मुंबईची मुंबई करू नका म्हणजे झालं.
क.मुं. (डोक्यावर हात मारून) : अरे गधडय़ा, डेट्रॉइट म्हणजे उजाड, ओसाड शहर. एकेकाळी अमेरिकेतलं हे शहर म्हणजे जगातल्या ऑटोमोबाइल उदय़ोगाची राजधानी होतं. पण, चुकीच्या धोरणांमुळे या शहराचं मातेरं झालं. ते बाराच्या भावात गेलं. आता इथे नुसत्याच मोठमोठय़ा इमारती आहेत, पण माणसं नाहीत, उदय़ोग नाहीत. सगळं शहर रिकामं होऊन गेलंय. उदय़ा मुंबईचंही तसंच होईल हा असाच कारभार राहिला तर!
प.मुं. (जोरात नाचत) ः अरे मग तर बेस्टच आहे की! तसं झालं तर तुम्ही सगळे उपरे परत आपापल्या भागात निघून जाल. आम्ही भूमिपुत्रच मुंबईत शिल्लक राहू. आम्ही पुन्हा मासे पकडू, मीठ पिकवू, शेती करू आणि सुखात राहू.
(कच्च्या मुंबईकराचा वासलेला `आ' तसाच राहतो. वाचकाहो, तुम्ही वासलेला `आ' मिटायला हरकत नाही.)

No comments:

Post a Comment