Tuesday, April 29, 2014

नोटा आणि 'नोटा'

`मयूर ट्रान्सपोर्ट'च्या ट्रकमध्ये बासरी ब्रँड बासमती तांदळाची शेवटची गोणी चढवल्याबरोब्बर किस्ना खाली उतरला आणि मुकादमाला वेळ विचारून तडक निघाला.
`घंटी वाजली किस्नाची,' मुकादम भिम्याला डोळा घालत म्हणाला.
घाम पुसत ताडताड चालत किस्ना वस्तीकडं निघाला. शेअरिंगच्या रिक्षाने लवकर पोहोचला असता, पण पाच रुपये खर्च झाले असते. दारूच्या कोटय़ासाठी ते वाचवणं आवश्यक होतं. आंटीच्या अड्डय़ात शिरल्याबरोब्बर त्याला बरं वाटलं. अर्जुनाने, त्याच्या नेहमीच्या पोर्याने आणून ठेवलेल्या पुडीतून एक उकडअंडं तोंडात घोळवून आत सोडता सोडता त्याने ग्लास तोंडाला लावला आणि संपवूनच खाली ठेवला, वर मिठाची चिमूट जिभेवर दाबली. पोटातला डोक्यातला जाळ जरा आटोक्यात आल्यावर त्याने अर्जुनाला हाक मारली आणि खिशातून वर उचलून कार्ड दाखवलं. अर्जुना जवळ येऊन म्हणाला, ``मिळालं का फोटू कार्ड? आता अन्नाला सांगून टाकतो. एक गांधी फिक्स.''
दुसर्या ग्लासातला जाळ रिचवून किस्ना म्हणाला, ``काय ते लवकर फिक्स कर अर्ज्या, कमळाबाई बी लय मागं लागलीये. आपन पंजाचं निमक खाल्लंय म्हनून पयलं तुला सांगितलं लगा! नंतर बोलू नको किस्ना कसा पलटला...''
किस्नाच्या खिशातलं प्लॅस्टिकच्या कडांचं कार्ड चमचमलं, तसं गुत्त्यात दारू पिण्याचा अभिनय करत बसलेले ते पाच जणही चपापले. त्यांनी फटाफट आपल्या खिशांमधून फोन काढले. चटाचट एसेमेस गेले, व्हॉट्सऍपवर मेसेज गेले, एकाने तर किस्नाच्या नकळत त्याचा फोटोही काढून पाठवला... सगळय़ांनी अत्यंत आनंदाने लिहिलं होतं, `आणखी एक मतदार सापडला.'
फटाफट पावशेर मारून फुटाण्याच्या पुडीतले उरलेले फुटाणे तेंडात टाकत किस्ना बाहेर पडून लगेच पुढच्या गल्लीत शिरला. एका कळकट इमारतीतल्या छोटय़ा गाळय़ाच्या बंद शटरवर त्याने हलकेच ठोठावलं, शटर वर झालं, तो आत शिरला, आतल्या एका बाकडय़ावर बसून त्याने हाळी दिली, ``धर्म्या, वजरी धाड!'' स्वतः धर्माशेट वजरी-भाकरीचं ताट, वरनं लालजर्द रस्सावाटी फ्रीमध्ये लावून घेऊन आला आणि ताट ठेवता ठेवता म्हणाला, ``काम झालं का?''
खिशातलं चकाकतं कार्ड दाखवून किस्ना म्हणाला, ``दोन गांधी पायजेत. नायतर आपला पंजा फिक्स.''
``असं काय करू नको दादा, दोन गांधी आणि वर एक इंग्लिशची चपटी पन लागू करतो तुला. पण, आपला शेठजीला सबूद गेलाय. आता फिरू नकोस.''
तिथेही कार्ड चकाकलं. तिथेही जेवणाचा अभिनय करत बसलेले तीन-चारजण चमकले. त्यांनी लगेच फोन बाहेर काढले...
`आणखी एक मतदार सापडला.'
*****
पावशेर मारून, वजरी खाऊन झोपल्यानंतर किस्नाला आजवर कधी सकाळी सातच्या आत जाग आली नव्हती. दिवसभर हमाली करून, मणामणाची पोती उचलून थकलेलं शरीर बाजेवर पट्दिशी शिथील होऊन जायचं. आज मात्र किस्नाला झोपेत जाणीव झाली की झोपडीत आणखी कोणीतरी आहे, तो सावध झाला, प्रचंड कष्टाने त्याचा डोळा उघडला आणि तो चमकलाच... त्याला घेरून त्याच्या उशा-पायथ्याला बरेच लोक तो उठण्याची वाट पाहात ताटकळत बसलेले... एकदोन जण तर वाराही घालत होते... आयला, झोपेत आटोपला का काय कारभार आपला? त्याच्या मनात पहिला विचार आला. पण, आपण चचलो, तर या परक्या शहरात आपल्याला खांदा दय़ायला चार माणसं जमायची मुश्कील होईल, ही एवढी परीटघडीची, सुंदर सुवासाची माणसं कुठून आपल्या मर्तिकाला जमायला... मग त्याच्या एकदम लक्षात आलं, आज आपलं किसन नंदलाल यादव हे नाव सार्थकी लागलेलं दिसतंय... महाभारतात कुरूक्षेत्रावर लढण्याच्या आधी कौरव आणि पांडव भगवान श्रीकृष्णाकडे पाठिंबा मागायला गेले होते... कृष्णाने चतुराईने कौरवांना यादवसेना दिली आणि आपण स्वतः पांडवांच्या लढाईचा सूत्रधार बनला, हे त्याला आजीकडून ऐकलेल्या गोष्टींमधून माहिती होतं... आज आपण येवढे इम्पॉरटन झालो, हा विचार मनात येतो न येतो, तोच समोरच्या चाणाक्ष दाढीवाल्याने किस्ना जागा झाल्याचं ओळखून नमस्कार करत हात जोडला, ``जै शिरीक्रिश्ना...''
``नुसतं किस्ना म्हना मला, तेच नाव आहे माझं. उगाच जड अवघड नाव नको...''
``मी नमस्कार केला तुम्हाला शिरीक्रिश्न भाऊ! आपल्या धर्ममधी किस्ना म्हंजे शिरीक्रिश्नाचाच नाम झाला ना भाऊ! केम छो, मजामा ना!''
``मजामा मजामा, तुम्ही कोण? चेहरा वळखीचा वाटतोय...''
``सू वात करे छे? अरे समदय़ा टीवी चॅनलमाटे माजाच तर चेहरा दिसते ना हल्ली! मला नमो नमः म्हणतात.''
``आता कळलं, नमो नमः, नमो नमः, माझ्याकडं पाहा आणि फुलं वाहा... तेच ना तुम्ही? काय काम काढलंत?''
``काही नाही, तुम्हाला विकासाचा चहा पाजायला आलोय मी. एकदम फक्कड मसाळानी चाय, अडानी, अंबानी कंपनीचा टेस्टी मसाला घातलाय तिच्यात दोन हजार कोटीचा, तुम्हाला लई भावेल, हुश्यार वाटेल...''
गरमागरम चहाचा कप पुढे आला खरा, पण, तो गोंडस हाताने बाजूला सारत गोंडस चेहरा पुढे आला...
``अंकल अंकल, लिसन टु मी, प्लीज डोंट ड्रिंक धिस टी. हा चहाचा नाही, जहराचा प्याला आहे. यात साम्प्रदायिकता, दंगाफसाद, बुरसटलेली वृत्ती यांचं विष मिसळलंय, धिस इज टोटली अनहेल्दी फॉर यू. तुम्ही आमची, गरिबाघरची रोटी खा,'' बरेच दिवस ठेवून बुरसटलेली एक रोटी त्याने पुढे केली. च्यामारी, ही याची आयडिया आहे होय. गरीबाच्या घरी जेवायला जातो. रोटय़ा खिशात भरून घेतो. नंतर अशा आम्हाला वाटायला! किस्नानं खिशातनं एक लिमलेटची गोळी काढून चिडलेल्या गोंडस पोराच्या हातात दिली आणि त्याचा गालगुच्चा घेत तो प्रेमभराने म्हणाला, ``पप्पू ना रे तू? शोना रे माजा तू. घे हे चॉकलेट.'' फुरंगटून पप्पू म्हणाला, ``हा काय नॉन्सेन्स आहे यार! मी देशात इतक्या लोकांकडे जातो, मत मागतो, लोक गालगुच्चा घेतात, काही आंटय़ा तर पप्पी पण घेतात आणि चॉकलेट देतात, आमी नाई जा!''
किस्ना त्याला समजावणार इतक्यात त्याच्या नाकासमोर झाडू आला, झाडूमागे एक मफलर आणि एक टोपी एवढंच दिसत होतं, व्हिक्सच्या वासाचा चोंदलेला आवाज म्हणाला, ``किस्नाजी, कैसे है आप? या दोघांच्या नादाला लागू नका. त्यांच्या नादाला लागूनच आपल्या देशाची साठ वर्षं बरबादी झालेली आहे. तुम्ही फक्त हा झाडू हातात घ्या आणि यांना झाडून टाका. यांची जागा कचरापेटीतच आहे. आँ आँ आँ ऑच्छी...''
झाडूवाल्याच्या शिंका थांबेनात... एवढय़ात दुसरा दाढीवाला चेहरा पुढे आला आणि म्हणाला, ``ई देखिये किस्नाजी, आप तो यादव हैं, तो ब्रजवासी हुए. ये सब बडी जाती के बडे लोग है, आप से वोट लेकर अपना ही भला करेंगे. आज तक इन्होने येही किया है, और ये जो झाडूवाले है, इन को झाडने के अलावा सिर्फ मोमबत्ती जलाना आता है. ये सत्ता मिलने के बाद खुद का भला न कर सके, आप का क्या भला करेंगे? आप के भले की तो सिर्फ हम सोचतें हैं...हमरे बिहार में आईये और खुद देख लिजिये... हम है तिसरा विकल्प...''
`तुम्ही कसले तिसरे, आम्हीच तिसरे' असा एकदम गिल्ला झाला. त्यात पहिले आणि दुसरेही आम्हीच तिसरे असं म्हणत घुसले, हे पाहून किस्नाला भारी मौज वाटली. अचानक त्याच्या डोळय़ांसमोर खंजीर चमकला, तो दिसल्याबरोबर सगळा गिल्ला थांबला, `साहेब, साहेब' असा दबक्या आवाजात उल्लेख झाला. किस्नाला समजलं, आज साक्षात क्रिकेटमंत्र्यांनीही पायधूळ झाडलीये आपल्या झोपडीत. ``किसनराव, यांना भांडूदय़ात हवं तेवढं. यासंबंधानं मी तुम्हाला इतकंच सांगेन की आम्ही काही तिसरेबिसरे नाही. आम्ही नेहमी पहिलेच असतो. जो कोणी सत्तेत येईल, त्याच्याबरोबर आम्ही असतो. पहिला आला तरी आम्ही आहोत, दुसरा आला तरी आम्ही आहोत आणि तिसरा आला तरी आम्ही काही टळत नाही. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. महाराष्ट्राकडे देशातलं सर्वोच्च पद चालून येण्याची संधी यंदा आहे. तेव्हा यासंबधानं तुम्ही योग्य निर्णय घ्यालच, याची मला खात्री आहे.''
एकसुरात बोललेलं हे भाषण संपतं ना संपतं तोच त्याच्या नजरेसमोर इष्टमनकलर तारे चमकले आणि चट्टेरीपट्टेरी शर्टामागून आवाज आला,
`` वाघाला पँथरची साथ आहे
ऊसाला कमळाचा सुवास आहे
मत दे माझ्या मित्रा, आम्हाला
दास तुझा हा रामदास आहे''
`वाहव्वा वाहव्वा' असे काही आवाज नाईलाजाने उमटले आणि किस्नाचा हात कोणीतरी खस्सकन् ओढला... ``डॅडा डॅडा, सापडला सापडला...''
``आण तो इकडे,'' असा आवाज झाला आणि हाताभोवती फटाफट एक गंडा गुंडाळला गेला, कार्यकारीसम्राटांनी म्यानात नसलेली समशेर उपसून बोट (किस्नाचेच) कापण्याचा अभिनय केला, त्याच्या काल्पनिक रक्ताचा टिळा त्यालाच लावला आणि वर त्याला दम दिला, ``तुला आई भवानीची आण, तुला भारतमातेची आण, तुला हिंदवी स्वराज्याची आण, तुला शिवरायांची आण, तुला थोरल्या साहेबांची आण, तुला माँसाहेबांची आण, तुला अरबी समुद्राची आण, तुला वांद्रे वरळी सी लिंकची आण...''
``बेटा, तुझ्या डॅडांसाठी पलीकडच्या मडक्यातनं पाणी आण,' असं करडय़ा आवाजात सांगून मनसम्राट पुढे आले आणि म्हणाले, ``हे बघ किस्ना, मी काही तुझ्याकडे भीक मागणार नाही मताची. तुला दय़ायचं त्याला दे, पण, नंतर बोंबलत बसू नकोस पाच वर्षं. आत्ताच काय तो विचार कर. आतापर्यंत यांनी काय दिवे लावलेत ते पाहतोच आहेस तू. आम्हीही काय उजेड पाडलाय, ते तुझ्यासमोर आहे. नको तिथे फालतूगिरी करून आयुष्यभर आपल्या चुकांचा टोल भरत राहायचा की माझ्या विकासाच्या ब्लूप्रिंटवर शिक्का मारायचा, हे तू ठरव. येतो मी.''
``चला रे, काय दत्ताचं देऊळ आहे का हे आणि आज काय गुरुवार आहे का, उठताय का आणू बांबू,'' असा आवाज मनसम्राटांनी टाकताच किस्नाभोवतीची गर्दी पांगली. सगळे गेल्यावर किस्ना हुश्श करून डोळे मिटणार तेवढय़ात त्याला काठीचा आवाज आला... टक्टक् टक्टक्... समोर बापू...
``आलास का केमिकल लोच्या करायला?'' किस्नाने हात जोडून विचारलं.
``मी लोच्या करायला येत नाही किस्ना, मी झालेले लोच्ये दुरुस्त करायला येतो,'' बापू म्हणाले, ``इतके लोक तुला भेटून गेले. कोण कौरव, कोण पांडव हे कळेनासं झालंय या महाभारतात. आज यांना पाहून माझ्याच डोक्यात केमिकल लोच्या झालाय. या सगळय़ांच्या भेटीतून तुला काय समजलं, ते सांग.''
``बापू, आपला सीधा हिसाब आहे,'' किस्ना कुशीवर वळत म्हणाला, ``जो एक बापू देईल, त्याच्याकडून एक बापू घ्यायचा, जो दोन देईल त्याच्याकडून दोन घ्यायचे, कोण चपटी देईल तर ती घ्यायची...'' बापूंच्या चेहर्यावर निराशा दाटू लागली, किस्ना बोलतच राहिला, ``कारन हय़ांच्याकडनं आमच्यासाठनं नंतर काही होनार नाही, हे तर फिक्स आहे. हय़े परत पाच वर्षं तोंड दाखवायचे नाहीत. हय़ांच्याकडनं सगळं घ्यायचं आनि...'' बापू कानात प्राण आणून ऐकू लागले ``...आनि विलेक्शनच्या दिवशी येकच बटन दाबायचं...''
``कोणतं?'' बापूंनी उत्कंठेने विचारलं...
`वरीलपैकी कोणीही नाही!!''

No comments:

Post a Comment