दोन
हजार सालाचा जून महिना.
पुलंच्या आजारपणाच्या बातम्या पुण्याहून मुंबईत येत होत्या. हे शेवटचंच आजारपण ठरेल अशी भीती व्यक्त होती. ते डेक्कनवर प्रयाग हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते, आयसीयूत व्हेंटिलेटरवर होते. तेव्हा पुण्यात मटाचे प्रतिनिधी असलेल्या गोपाळराव साक्रीकरांनी, पुलं खरंतर गेलेच आहेत, तसं जाहीर करत नाहीयेत, अशा आशयाची छोटी बातमी लिहिली होती बहुतेक. पुण्यातले एक प्रसिद्ध आणि सांस्कृतिक क्षेत्रात उठबस असलेल्या वजनदार राजकीय नेते हॉस्पिटलमध्येच कोणाला तरी त्या आशयाचं बोलले, ते साक्रीकरांनी ऐकलं आणि त्यावरून बराच गोंधळ उडाला.
पुलंना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलं होतं...
...महाराष्ट्र टाइम्सचे तेव्हाचे संपादक कुमार केतकर यांनी मला सांगितलं, तू पुण्याला जा. पुलं क्रिटिकल आहेत. साक्रीकर एकटेच आहेत. त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून आता काय देता येतील त्या बातम्या दे. पुलं अचानक गेले, तर आपण बातमीदारीत कमी पडायला नको...
त्यांना
काही अंदाज असावा...
...मी ११ जूनच्या सकाळी प्रयागला पोहोचलो. एका कोपऱ्यातल्या खोलीत पुलंना ठेवलं होतं. खिडकीतून त्यांचं दर्शन होत होतं. असंख्य नळ्या आणि यंत्रणा लावलेला देह. पुलंचे स्नेही मधू गानू हे तिथे दिवसरात्र मुक्काम ठोकून होते. सुनीताबाई येऊन-जाऊन होत्या. पुण्यातल्या आणि बाहेरच्या अनेक वर्तमानपत्रांचे वार्ताहर प्रयागवर मुक्कामच ठोकून होते. काही इथल्यांशी बोलून फोनवरून खबर घेत होते. टीव्ही पत्रकारिता फोफावलेली नसल्यामुळे ‘पुलंनी अचानक श्वास घेतला, अरेच्चा, एक नळी निसटली, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व मृत्युशय्येवर असताना सुनीताबाई कुठे आहेत, पुलं खरोखरीच जिवंत आहेत का,’ अशा थरारक आणि रोचक सवालांनी भरलेल्या ब्रेकिंग न्यूज आणि हेडलाइन्सना तेव्हाचा महाराष्ट्र मुकला, ही त्यातल्या त्यात दिलासादायकच गोष्ट म्हणायला हवी. तीही कसर रेडिओच्या एका अधिकारी बाईंनी ‘सुनीताबाईंनी रेडिओला ‘प्रतिक्रिया’ द्यावी’ असा हट्ट धरून काहीशी पूर्ण केली... बाईंनी ठाम राहून ‘ही ती वेळ नव्हे आणि तशी माझी मनस्थिती नाही’ असं सांगून त्यांना धुडकावून लावलं...
साक्रीकरांनी आधी दिलेल्या बातमीने मटाची बदनामी झाली, असं उघडपणे म्हणणारा प्रत्येकजण खासगीत मात्र ती बातमी खरीच होती, असं सांगत होता. वैद्यकीय काटेकोर अर्थ काहीही असो, साक्रीकरांनी ऐकलं त्यात तथ्यही होतं. पुलं आता परतण्यापलीकडे गेले होते, त्यांचा लाडका भाचा दिनेश अमेरिकेत होता. त्याला यायला काही दिवस लागणार होते. तो येईपर्यंत अंतिम संस्कार थांबवायचे, तर पुलंना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवणं आवश्यक होतं. तोपर्यंत हॉस्पिटलने ‘आज प्रकृती सुधारली,’ ‘आज पुन्हा चिंताजनक झाली,’ अशा प्रकारची तांत्रिकदृष्ट्या बिनचूक हेल्थ बुलेटिन काढत राहणंही आवश्यक होतं... अर्थात, यातलं खरंखोटं अधिकृतपणे कोणीही कधीच सांगितलं नाही... तशी आपल्याकडे परंपराही नाही.
प्रयागसमोरच्या फुटपाथवर इतरांबरोबर मुक्काम पडला. श्रीपाद ब्रह्मे, सुनील माने यांच्यासह पुण्यातल्या नव्या पिढीतल्या पत्रकारांची भेट झाली, ओळख झाली, शैलेंद्र परांजपेसारखे काही जुने यारदोस्तही तिथे भेटले. अनेकांना दिवसभराची कामं आटोपल्यावर प्रयागला चक्कर टाकून जा, असं ऑफिसने सांगितलं होतं. काही पुलंप्रेमापोटी आपणहून येत होते. मंडईत पत्रकारांचा एक अड्डा होता, त्याला मंडई विद्यापीठ म्हणायचो आम्ही. मुंबईतले वार्ताहर त्या काळात दादर स्टेशनबाहेर बबन चहावाल्याकडे भेटायचे, तसे पुण्यातले वार्ताहर मंडईत खन्नाच्या हॉटेलात भेटायचे. वाटाण्याची उसळ, पाव खायचा आणि मंडईत स्थानिक नेतेमंडळींबरोबर चहाच्या सोबतीने उत्तररात्रीपर्यंत गप्पा रंगवायच्या, असा कार्यक्रम असायचा. त्यामुळे एकतर प्रयागवरून लोक तिथे जायचे किंवा तिथून प्रयागला चक्कर मारायचे. जे मुक्काम टाकून होते, त्यांची जवळ गुडलकला चहा-बनमस्काची आचमनं होत होती. दिनेश मध्यरात्री भारतात पोहोचतोय, अशी खबर होती.
त्यानंतर काहीही होऊ शकत होतं... ही रात्र महत्त्वाची होती...
तेव्हा राज्यात युतीचं सरकार होतं. पुलंनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना सरकारला चार खडे बोल सुनावले होते. त्यावर युतीचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मोडका पूल’ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी कोटी केली होती. तेव्हा फेसबुक वगैरे सोशल मीडिया नसल्याने सरकारचा पुरस्कार स्वीकारताना सरकारवर टीका करण्याचा देशद्रोह केलेल्या पुलंना पाकिस्तानात किंवा गेलाबाजार कर्नाटकात तरी पाठवण्याच्या शिफारसींचा आगडोंब उसळण्याची सोय नव्हती... अर्थात, पुलंची प्रकृती बिघडल्यानंतर आणि अटळ परिणतीची जाणीव झाल्यानंतर बाळासाहेबांनी प्रयागमध्ये जाऊन पुलंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि ते आपले शिक्षक होते, अशी आठवण सांगून पुलंच्या थोरवीचे गोडवेही गायले होते. पुलंच्या निधनानंतर त्यांच्यावर शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्याचं राज्य सरकारने ठरवलं होतं... त्याला सुनीताबाईंनी नकार दिला होता...
...त्यामुळेही दिनेशच्या आगमनानंतर काहीही घडण्याची शक्यता होती...
...सुनीताबाई निर्धारी वृत्तीच्या होत्या... त्यांनी सरकारचा प्रस्ताव धुडकावायचं ठरवलं तर दिनेश आल्यानंतर अधिकृतपणे निधन जाहीर करून पुण्याला जाग येण्याच्या आत पहाटेही पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन जातील, अशी भीती अनेकांना वाटत होती...
आता पुलं हयात नाहीत... प्रयागमध्ये नळ्या लावलेला देह हे आता पार्थिवच आहे, याबद्दल मात्र कोणाच्याच मनात फारशी शंका नव्हती...
...रात्र झाली, गर्दी ओसरली...
डेक्कनचा एरिया असल्याने बारापर्यंत जाग होती, नंतर रस्ताही सुनसान झाला...
पुण्यातले
नवेजुने आठनऊ रिपोर्टर, प्रतिनिधी असे आम्ही प्रयागसमोरच्या फुटपाथवर होतो...
...मध्यरात्रीनंतर सुनीताबाई तिथे आल्या... सोबत जब्बार पटेल होते... ते बाहेर येऊन गप्पा मारताना मला म्हणाले, सुनीताबाईंना भेटलास का? पुलंना पाहिलंस का?
मी म्हणालो, पुलंना खिडकीतून पाहिलं... सुनीताबाईंना काय भेटणार? त्यांची-माझी तशी फार मोठी ओळखही नाही आणि आता त्यांची मनस्थितीही तशी नसेल.
जब्बार म्हणाले, बाईंनी आता सगळं स्वीकारलंय आणि त्या मेंटली कंपोझ्ड आहेत. फार खंबीर आणि धीराच्या आहेतच त्या. भेट तू त्यांना.
ते आत घेऊन गेले. पुन्हा एकदा पुलंच्या त्या निश्चेष्ट, चैतन्यहीन शरीराचं दर्शन घेतलं आणि मनातून पुसून टाकलं... पुलंचा सचेतन चेहरा, हृदयाला साद घालणारा जिव्हाळ्याचा आवाज आणि ते मिष्कील, खोडकर हसूच आठवणीत ठेवायचं होतं... जब्बारांनी सुनीताबाईंशी भेट घालून दिली... मी पुलंच्या घरी कधी काळी पुलंची भाषणं उतरवायला गेलो होतो, त्याची आठवण बाईंना करून दिली... त्यानंतर एनसीपीएमध्ये त्यांच्यासोबत खाल्लेले मासे... मग खूप नंतर आल्हाद गोडबोलेंबरोबर धावती भेटही झाली होती उभयतांची मालती-माधवच्या नवीन घरामध्ये.. सुनीताबाई बाहेरून अगदी नॉर्मल दिसत होत्या... आत मात्र सगळं काही ठीक नसावं... कसं असेल?
सुनीताबाई
गेल्या आणि सगळ्यांचे डोळे दिनेशच्या आगमनाकडे लागले... त्याचं विमान मुंबईत मध्यरात्री लँड होणार होतं... त्याला पुण्याला आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल दिला गेला होता... म्हणजे मुख्यमंत्र्यांची गाडी ज्या प्राधान्याने प्रवास करते, ते प्राधान्य आणि पुढेमागे लाल दिव्याच्या गाड्या वगैरे... ही व्यवस्था ज्या क्षणी स्वीकारली गेली असेल, त्या क्षणीच सुनीताबाईंनी सरकारी इतमामही स्वीकारला असणार, असं वाटतं... त्यांच्या मनधरणीची जबाबदारी जब्बार पटेलांवर दिली गेली असावी... पुलंवर तुमचा अधिकार आहे तेवढाच मराठी माणसांचाही अधिकार आहे, सरकार सगळ्या मराठीजनांचं प्रतिनिधित्व करतं, तेव्हा हा इतमाम स्वीकारायला हवा, अशी त्यांची मनधरणी केली गेल्याची चर्चा होती...
...उत्तररात्री किंवा खरंतर पहाटेच्या सुमारास सुनीताबाई आणि मधू गानू अचानक आले आणि आत गेले...
दिनेश
पोहोचत असणार ही अटकळ खोटी ठरली नाही... दूरवर लाल दिवे दिसू लागले, सायरनचा आवाज येऊ लागला... दिनेश आला होता... चितळ्यांकडून दूध आणायला निघालेले तुरळक पुणेकर आणि पेपरवाले यांचं कुतूहल जागवत दिनेश मोटारीतून उतरला आणि तडक पुलंच्या खोलीकडे गेला... आम्हीही मागोमाग धावलो... पण, टीव्ही पत्रकारितेचा उदय झालेला नसल्याने वार्ताहरांनी त्याला अडवून काही प्रश्न वगैरे विचारले नाहीत किंवा त्याच्यामागोमाग ते आत घुसले नाहीत... एका मानसपुत्राची मानसपित्याशी भेट होते आहे, याचं गांभीर्य पाळून त्या कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर राखला गेला... आम्ही सगळे खिडकीपाशीच थांबलो... पुलंच्या देहासमोर उभं राहून दिनेश बराच काळ त्यांच्याकडे पाहात होता... मग तो काहीतरी उत्कटनेते बोलू लागला... ती रवींद्रनाथांची (बहुदा पुलंची अतिशय लाडकी अशी) एक कविता
होती, अशी माहिती नंतर मिळाली...
...दिनेश तडक बाहेर आला आणि सुनीताबाई, मधुभाईंबरोबर घरी गेला...
पुलंच्या जवळ आता आमच्याशिवाय कोणीच नव्हतं...
पुढे
काय होणार, हे स्पष्ट होतं...
...कधी होणार, एवढाच प्रश्न होता...
...आम्हीही चहा-नाश्त्यासाठी गुडलककडे वळलो... परतलो तेव्हा कळलं की पुलं अजूनही ‘जिवंत’च आहेत, त्यामुळे फ्रेश होण्यासाठी घरी गेलो... अंघोळ-नाश्ता करून थोडी झोप काढण्यासाठी आडवा झालो, तोच फोन घणघणला... पलीकडे केतकर होते... म्हणाले, तू घरी कसा? म्हटलं, आताच आलोय... रात्रभर तिथेच होतो... ते म्हणाले, निधन घोषित झालंय... गो बॅक. दिनेश येऊन गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे लाइफ सपोर्ट सिस्टम काढण्याचा निर्णय झाला होता... ती काढल्यानंतर जे अटळ होतं, ते घडलं होतं...
पुन्हा
प्रयागला गेलो, तोवर सगळा माहौल बदलला होता... सरकारी इतमाम स्वीकारण्यात आल्यामुळे मालतीमाधवच्या प्रांगणात अंत्यदर्शनाची व्यवस्था झाली होती... लोकांच्या रांगा लागल्या होत्या... मुंबई दूरदर्शनचे मुकेश शर्मा हे केंद्र संचालक स्वत: अंत्ययात्रा कव्हर करायला तिथे हजर झाले होते... अंत्ययात्रेचं थेट प्रक्षेपण होणार होतं... सुधीर गाडगीळ लाइव्ह निवेदन करणार होते... पांढरं शर्ट, पांढरी पँट, पांढरे बूट, अशी जितेंद्रछाप वेशभूषा केलेले, फिल्मी नटासारखे दिसणारे आणि तसेच वागत असलेल्या शर्मांना औचित्य नाही का, असा प्रश्न पडत होता... पण, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या अंतिम यात्रेसाठी त्यांनी केलेली अभूतपूर्व तयारी पाहता तसं म्हणणंही धाडसाचं ठरलं असतं...
...मालती माधवच्या प्रांगणात अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे अनेक मान्यवरांनी आणि चाहत्यांनी साश्रुनयनांनी पुलंचं अखेरचं दर्शन घेतलं...
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली, ती शववाहिनीतून. तेव्हा रस्त्याकडेला तुरळक गर्दी होती.
वैकुंठात
पोहोचल्यानंतर पुलंच्या पार्थिवासमोर पोलिसांनी गोळीबाराच्या फैरी झाडल्या...
हे
पाहून आता पुलं उठून काहीतरी समर्पक कोटी करतील, असं वाटत होतं...
पुलंना
विद्युतदाहिनीकडे नेलं गेलं तेव्हा स्मशानातली गर्दी नियंत्रित करण्यासाठी माइकवरून बोलणाऱ्या जब्बार पटेलांनी ‘भाईंच्या मागे कोणीही जायचं नाहीये’ असं नकळत बोलून अनपेक्षित हशा पिकवला, तेव्हा परीटघडीचं अवघडलेपण वितळलं... मृत्युचं सावट हललं आणि आनंदयात्री पुलंची अंतिम यात्रा जशी असायला हवी होती, तशीच नकळत होऊन गेली...
...मटाने पुलंच्या निधनाच्या बातमीला ‘गोपाळ साक्रीकर/मुकेश माचकर’ अशी संयुक्त बायलाइन दिली होती. हा केतकरांचा
निर्णय होता. निधनाच्या बातमीला बायलाइन ही मराठीत अभूतपूर्व घटना होती. अनेकांनी त्यावर टीकाही केली. बायलाइनचा आग्रह जणू आम्ही धरला असावा, अशी आमच्याबरोबर वार्तांकन करणाऱ्या आणि त्यांच्या वर्तमानपत्रांत अर्थातच बायलाइन न मिळालेल्या वार्ताहरांची समजूत झाली... आम्हाला पेपर हातात येईपर्यंत हे माहितीही नव्हतं... नंतर मुंबईला परतल्यानंतर केतकरांना विचारलं, तुम्ही ही अशी पंचाईत का केलीत आमची? फार कानकोंडे झालो आम्ही.
केतकर
म्हणाले, पुलंचं निधन ही महाराष्ट्रासाठी केवढी मोठी घटना होती, हे समजावं, यासाठी मी आग्रहाने बायलाइन दिली. ते आकस्मिक नव्हतं. वर्तमानपत्रं युद्ध कव्हर करायला बातमीदार पाठवतात, सगळ्या वर्तमानपत्रांचे वार्ताहर त्याच युद्धाच्या बातम्या देत असतात, तरीही त्यांच्या बायलाइन छापल्या जातातच. आपण या घटनेला स्वतंत्र माणूस पाठवून कव्हर करण्याइतकं महत्त्व देतो, हे त्यातून सांगायचं असतं. पुलंचं निधन ही आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातली त्याच तोलामोलाची घटना आहे. म्हणून ही बायलाइन दिली. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो आणि आहे.
गंमत
म्हणजे कुमार केतकर मटाचे संपादक झाले त्याच काळात, सुटीच्या दिवशी मी पुण्यात येऊन पुलंच्या पुस्तकांसाठी त्यांची भाषणं उतरवून घ्यायचो. एकदा भल्या सकाळी पुलं आणि सुनीताबाईंबरोबर त्यांच्याच आग्रहाने नाश्ता करत होतो. एवढ्या मोठ्या माणसांशी काय बोलायचं या विचारात असताना मटाचा विषय निघाला. पुलंचे घनिष्ट मित्र असलेल्या गोविंदराव तळवलकरांनी संपादकपद सोडल्यानंतर पुलं आणि सुनीताबाईंचं मटाबरोबरचं मैत्र संपुष्टात आलं होतं. शिवाय केतकरांनी पुलंवर कधीकाळी खरपूस टीकाही केली होती. सुनीताबाई म्हणाल्या होत्या, तळवलकरांशी आमचा स्नेह होता. केतकरांशी तशी ओळख नाही. आता वयोमानाप्रमाणे कुठलाच पेपर पाहिला जात नाही. तो विषय तिथेच थांबला.
आता
मात्र त्याच केतकरांनी पुलंचं निधन कव्हर करण्यासाठी खास वार्ताहर पाठवला होता... पुलंवरचा त्या दिवशीचा निर्विवादपणे सर्वोत्तम अग्रलेख त्यांनी लिहिला होताच... त्यात आपली अँग्री यंग पिढी पुलंचं मोठेपण समजण्यात कमी पडली, अशी खुली कबुलीही त्यांनी दिली होती... मात्र, केतकरांनी खरी कमाल दुसऱ्या दिवशी केली... त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा ‘प्रिय सुनीताबाई’ असा आणखी एक अत्यंत
हृदयस्पर्शी अग्रलेख लिहून त्यांनी जबरदस्त षटकार मारला... तुमचं दु:ख तुमचं नाही, सगळ्या महाराष्ट्राचं आहे, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, हे अतिशय हृद्य भाषेत त्यांनी लिहिलं होतं... या दोन अग्रलेखांनी सगळे दुरावे एका फटक्यात वितळवून टाकले... सुनीताबाई आणि मटा यांच्यातला स्नेह पुन्हा दृढमूल झाला...
पुलंच्या
निधनाचा मटाचा अंक कलेक्टर्स इश्यू ठरला... तो त्या दिवशी ब्लॅकने विकला गेला... दुसऱ्या दिवशी तर पंधरावीस रुपयांना मिळत होता म्हणे तो...
आता,
पुलंच्या प्रत्येक स्मृतीदिनाला ती रात्र आठवत राहते...
कुमार
केतकरांनी जे सांगितलं ते किती खरं होतं, ते कळलं... तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला एक फार मोठा प्रसंग तर होताच... त्याचा साक्षीदार असणं हे (पुलंच्या मोठेपणामुळे) पत्रकारितेच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड बनणारच होतं... पण, आपल्यासाठी दैवतासमान असलेल्या लेखक-कलावंताच्या अखेरच्या क्षणांत त्यांची दूरस्थ का होईना सोबत करू शकलो, याचा विषण्ण करणारा आनंदही लाभलाच...
आता
पुलंचा अचेतन देह आठवतच नाही... आमच्यासाठी ते फक्त एक पार्थिव होतं, ते पुलं नव्हतेच...
त्यामुळे
त्या रात्रीची आठवण म्हणून लक्षात राहिली ती पुलंना रवींद्रनाथांची कविता ऐकवणाऱ्या दिनेशची धीरगंभीर मूर्ती...
Chan..lihaly...
ReplyDeleteखुप छान.माहिती खुप छान आहे.आमच्या ब्लॉगल पण नक्की भेट द्या JIo Marathi
ReplyDeleteChaan
ReplyDeleteHey,
ReplyDeleteThanks for sharing this helpful & wonderful post. i really appreciate your hard work. this is very useful & informative for me.
thanks for sharing with us. thanks a lot.
Regards
SARKARI KAM