किमयाच्या जन्माच्या
आसपासच फेसबुकवर अॅक्टिव्ह झालो आणि घरून काम करताना या नव्या माध्यमावरही लिहिता
झालो, त्यावर
अनेक प्रयोग केले, ते करताना या दोन मुलींचे किस्सेही लिहीत
गेलो… त्यांचा-माझा
एकत्र प्रवास या वेगळ्याच माध्यमात टप्प्याटप्प्याने डॉक्युमेंटच होत गेला… या
लेखाच्या निमित्ताने त्याही बाहेर पडल्या… त्यातल्या या निवडक पोस्टी…
१.
रात्री झोपण्याआधी पुस्तक वाचत बसलो
होतो... किमया म्हणाली, मला पण वाचायचंय...
म्हटलं शोध काहीतरी.
ती पुलंचं हसवणूक घेऊन आली...
पुलं आउटडेटेड आहेत, त्यांचे विनोद तुझ्याआधीच्या पिढीलाही कळेनासे झाले होते तर तुला काय कळणार, त्यात
तू इंग्लिश मीडियमची, वगैरे सांगून ते पुस्तक काढून घेणार होतो, पण, घरात
चार्ली
चॅप्लिनबरोबर पुलंआजोबांचा फोटो असताना
आणि ते बाबासाठी फार स्पेशल आहेत, हे माहिती असताना तिला
हे सांगणं प्रशस्त वाटेना. शेवटी शत्रुपक्षातल्या प्राण्यांचा लेख तिला काढून दिला.
थोड्या वेळाने ती हसू लागली.
मी चाट पडलो.
हातातलं पुस्तक खाली ठेवून तिला म्हणालो, उगाच खोटं खोटं हसण्याची गरज नाहीये. काय कळलं तुला?
ती म्हणाली, भारी जोक होता.
मी संशयाने विचारलं, काय जोक होता?
ती म्हणाली, त्यांनी लिहिलंय, दुधाचे दात तुटून भाकरी-पोळीचे दात आले. सो फनी!
पुलंचा विनोद तिला कळला
आणि माझ्या पिढीचा थोडासा ठेवा तिच्याकडे गेला, म्हणून फारच भारी वाटलं.
२.
या पिढीतल्या सगळ्या पोरांप्रमाणे किमया आणि अनया या दोघींनाही रात्र होत जाते तसतसा जोर येत जातो… त्या चेकाळतातच…
बिछान्यात मी त्यांना झोपवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या तो
हाणून पाडत होत्या. एक पाठीवर स्वारी करायचा प्रयत्न करत होती, दुसरी हाताला धरून खेचत होती. दोघीही माझ्या कानात आळीपाळीने तारस्वरात किंचाळत, चीत्कारत होत्या.
मी नाटकी
स्वरात म्हणालो,
तुम्ही दोघी मुली जर अशाच वागत राहिलात तर मी लवकरच ठार वेडा होईन आणि नंतर मला कुणी विचारलं तर सांगेन मी माझ्या या दोन मुलींमुळे वेडा झालोय.
क्षणात शांतता पसरली…
तीर वर्मी लागल्याचा आनंद
झाला.
खेदप्रकटनाची प्रतीक्षा
सुरू झाली.
किमया शांतपणे म्हणाली, पण, तुम्ही खरोखरच वेडे झालात, तर तुम्हाला असं शहाण्या माणसासारखं त्याचं कारण कसं सांगता येईल?
पाठोपाठ अनया म्हणाली, वेडे झालात तर तुम्ही तुमचं नावपण विसराल ना? मग आपण
वेडे झालोय आणि मुलींमुळे वेडे झालोय, हे तुमच्या कसं लक्षात राहील?
वाचवा, वाचवा, कोणीतरी मला या दोन मुलींपासून वाचवा…
३.
किमया पहिलीत असताना तिचं पूर्ण नाव तिच्याकडून घोटून घेत होतो,
'तुझं नाव, किमया मुकेश माचकर...'
ते एक-दोनदा घोटून झाल्यावर तिने माझ्याइतक्याच गांभीर्याने मला माझं नाव सांगितलं, ‘तुझं नाव, मुकेश किमया बाबा!'
आहे ना 'रिश्ता वही, सोच नयी!'
४.
एके रात्री किमया अमिताबरोबर झोपलेली असताना अचानक झोपेतून उठली आणि तिने बराच गोंधळ घातला. काहीतरी आचरटासारखं बोलून, रडून झोपून गेली.
सकाळी अमिताकडून हे कळल्यावर तिला जाब विचारला,
तर म्हणाली,
`छे, छे, असं काही झालंच नाही.’
‘म्हणजे मम्मा काय खोटं बोलतेय का?’
किमया म्हणाली, ‘असं काही झालेलं नाहीये. मम्माला तसं स्वप्न पडलं असणार.’
५.
अनया एकदम फुल टू
पप्पीमास्टर आहे… सतत पप्प्या द्यायला नुसती कारणंच शोधत असते… कारणांचीही गरज नसतेच खरंतर तिला. मूड आला की गळ्यात पडून गाल आपल्या बाजूला फिरवून पप्पी देऊन मोकळी होते. परतफेडीची अपेक्षाही ठेवत नाही.
किमया मात्र असलं काही करत नाही. ती सांगत होती, सिनेमात आणि टीव्हीत फार वाईट दाखवतात. त्यात लोक सारखे पप्प्या घेत असतात. मम्मीपपांना, आजीआजोबांना पप्प्या दिल्या तर छान असतं. पण, फ्रेंड्समध्ये आणि लव्हबिव्हमध्ये पप्प्या देतात, ते
बघायला मला अजिबात आवडत नाही. मी
मोठी होऊन डिरेक्टर बनेन तेव्हा असले सिनेमे काढणार नाही. सगळे छान माहिती देणारे, नॉलेज देणारे,
चांगलं चांगलं शिकवणारे सिनेमे काढणार आहे…
…
…
सांभाळावं लागणार आहे फार पुढे…
…
…
किमयाला!!
६.
किमयाला
वाचा फुटली नव्हती, तोवर
ती मला 'मा' म्हणायची... हा 'माँ' अर्थात
आईमधला 'मा' नव्हता
(तो
तसा असता तरी आमच्या नातेवाईकांना आणि तिच्या माँलाही आश्चर्य वाटलं नसतं). हा ‘मा’ होता 'माचकर'मधला. तिची आई मला 'माचकर' अशी
हाक मारते… किमयाला
एवढा मोठा शब्द उच्चारता येणं कठीण होतं… त्यामुळे तिने ‘मा’वर
काम भागवलं… त्याआधी
ती मला 'आई' अशी
हाक मारायची, ते
यानिमित्ताने बंद झालं हेच खूप झालं ना हो…
७.
प्रवासात माझ्या मांडीवर पाय आणि आईच्या मांडीवर डोकं अशा अवस्थेत आरामात पहुडलेल्या किमयाच्या चेहरेपट्टीचं निरीक्षण करून मी अमिताला म्हणालो, `ही पुढे तुझ्यासारखी दिसणार.''
तिच्या बाबा-प्रेमातून किमयाकडून लगेच काय उत्तर येईल, हे लक्षात घेऊन अमिता तिची नक्कल करत म्हणाली,
``(ही म्हणेल) छे
छे, मी
बाबासारखी दिसणार...''
खाडकन् डोळे उघडून किमया म्हणाली, ``मी
माझ्यासारखी दिसणार!''
मुलगी मोठी झालीच की हो!!
८.
एका रात्री किमयाने अमिताला विचारलं, मी सूर्यनमस्कार घालून दाखवू?
अमिता म्हणाली, अगं, रात्र झाली आता, ही काय वेळ आहे का? सूर्यनमस्कार सकाळी घालायचे असतात.
यावर अनयाने सॉलिड तोडगा काढला, ती म्हणाली, जाऊदे ताई, तू
चंद्रनमस्कार घाल!
९.
बंद पडलेला आणि अनयाला खेळणं म्हणून दिलेला मोबाइल कानाला लावून छोटी अनया बराच वेळा तक्रारखोर सुरात बोलत राहिली आणि मग
जिच्या मांडीवर बसून हे
सगळे उद्योग सुरू होते, त्या आजीला म्हणाली,
बघ ना, माझा नवरा सारखा सारखा फोन करून डिस्टर्ब करतोय.
हे
ऐकून तिच्याकडे रोखून पाहात जाब विचारला, तेव्हा आधी मला इकडून तिकडे घुमवण्याचा प्रयत्न करून, मी
बधत नाही, हे लक्षात आल्यावर ती साळसूदपणे म्हणाली, माझा भाऊ होता रे फोनवर!
...
...
वय वर्षं पावणेतीन बरं का!!
१०.
अनया एकदा गंभीरपणे म्हणाली, पप्पा, तुम्ही खूप जाडे आहात, त्यामुळे तुम्ही मम्मीचे पप्पा दिसताय,
बारीक व्हा ना, म्हणजे आमचे पप्पा दिसाल...
११.
एकदा अनयाला विचारलं, इंडिया म्हणजे काय तुला माहितीये का?
ती
कशालाच नाही म्हणत नाही... आइनस्टाइनचा सापेक्षतावादाचा सिद्धांतही तिला माहिती असतो आणि स्टीफन हॉकिंगचं अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइमही
तिला समजलेलं असतं...
त्याच आत्मविश्वासाने तिने सांगितलं,
हो माहितेय की!
म्हणालो, सांग इंडिया म्हणजे काय?
ती म्हणाली, अरे, जर का
कोणाला क्रिकेट खेळायचं असेल, तर
त्यांना टीम
बनवायला लागतात ना! मग
कोणाला पाकिस्तान बनवतात, कोणाला वेस्ट इंडीज आणि कोणाला इंडिया बनवतात. सिंपल.
१२.
अनयाशी एक पैज लावली... दहा रुपयांची.
ती
मी जिंकलो.
रात्री काम करत बसलो असताना आली, शिस्तीत १० रुपयांचं नाणं माझ्या टेबलावर ठेवलं.
मी
थँक यू
म्हणालो.
ती
एकदम मॅटर ऑफ फॅक्ट पद्धतीने म्हणाली, थँक यू
बिंक यू काही नको. हे पैसे काही मी तुम्हाला गिफ्ट दिलेले नाहीत. पैजेचे आहेत. घ्या.
१३.
अनयाला अंघोळ घालत होतो. तिने शांतपणे अंघोळ करावी यासाठी बदल्यात मी तिचं एक गाणं ऐकायचं अशी मांडवली झाली होती.
तिचं ते गाणं ऐकल्यावर विचारलं, कसलं गाणं आहे?
ती म्हणाली, सिनेमातलं.
कोण आहे या गाण्यात?
टायगर श्रॉफ.
हा कोण आहे?
अॅक्टर आहे.
अरे वा, जनरल नॉलेज चांगलंय तुझं. इतर कोण कोण माहिती आहेत?
पंडित नेहरू, महात्मा गांधी ही नावं ऐकलीत का?
हो. शाळेत ऐकलीयेत.
नरेंद्र मोदी माहिती आहेत का?
हो.
कोण आहेत ते?
ते पण एक अॅक्टर आहेत.
काय? ते कुठे अॅक्टिंग करतात?
ती म्हणाली, बातम्यांमध्ये!!!
मोदींप्रमाणेच तरुण पिढीकडून मलाही फार अपेक्षा आहेत त्या उगाच नव्हेत.
१४.
'पप्पा, उद्या मी झोपले होते, तेव्हा ना मला एक स्वप्न पडलं,' इति अनयाच.
'अगं 'उद्या'
नाही गं, काल
झोपली होतीस तेव्हा…'
'नाही हां. काल तर उद्या असतो. स्वप्नात काय दिसलं माहितीये का? आपण
ना घरात चाललो होतो. तिथे एक लायन आला. त्याने तुम्हाला आणि ताईला खाऊन टाकलं. मी आणि मम्मा लगेच घरात गेलो. पण, तुम्ही सॉलिड आयडिया केलीत. लायनच्या पोटातून तोंडातून चालत चालत बाहेर आलात. ताईलापण घेऊन आलात. मग लायनला कळलं तुम्ही किती स्ट्राँग आहात. तो नंतर आपल्या घरी सॉरी म्हणायला आला होता.'
'फेकतेयस तू. मला आणि ताईला लायननी खाल्लं एवढंच स्वप्न पडलं
असणार तुला. पुढे मी त्याच्या तोंडातून बाहेर आलो वगैरे सगळी टेप लावतेयस…'
'अरे नाही पप्पा, पुढचं पण खरं आहे, तेव्हा तुम्ही इंटेलिजंट झाला होतात…'
'मी इंटेलिजंट झालो होतो?… मग बरोबर, खरोखरचं स्वप्नच असणार ते…'
१५.
‘पा, शीशी झाली,’ अनयाने पुकारा केला...
मी
पुढच्या स्वच्छ भारत
अभियानासाठी टॉयलेटकडे धावलो.
बाहेर येताना तिने विचारलं,
‘पा, एक शीशी कपूरही असतो ना टीव्हीवर.’
तिला म्हटलं, ‘गधडे, हळू बोल नाहीतर आई तोंड फोडेल तुझं. तिचा लाडका
आहे तो शशी कपूर.’
...
...
थोड्या वेळाने येऊन म्हणाली, ‘पा, तुम्ही माझ्या पँटला पाणी घालाल ना?’
आयला, आता हिने पँटचं झाडबिड लावलंय की काय, म्हणून डोळे चकणे
होण्याच्या बेताला असताना लक्षात आलं की ती प्लँट म्हणतेय प्लँट...
शाळेतली अॅक्टिव्हिटी म्हणून कुंडीत लावलेलं मुगाचं रोप.
कठीण आहे राव.
भन्नाटच
ReplyDeleteभारी आहेत पोरी .
ReplyDeleteमाझा भाऊ होता रे फोनवर... हाहाहा. मस्त आठवणी आहेत ह्या सगळ्या. खूप खूप गोड.
ReplyDeleteSuperb!
ReplyDeleteक्या बात है, एकाहून एक वरचढ किस्से आहेत 👌
ReplyDeleteलै भारी .. गोड आहेत मुली !!
ReplyDeleteमस्त किस्से
ReplyDeleteखूपच भारी आहेत हे सगळे किस्से! मुलं मोठी झाली की हे वाचून वाचून हसत राहतील आणि असच पुढें हे किस्से आपल्या तुमच्या नातवंडांना सांगतील
ReplyDeleteएक नंबर भारीच
ReplyDelete