Tuesday, March 8, 2011

नेमाडे, भावना, परंपरा वगैरे


उदाहरणार्थ हे काही बरोबर नाही. कधी कधी माऊली फारच पंचाईत करतात बुवा! माऊली म्हणजे गुरुमाऊली... आमच्या पंथाचे सद्गुरू. महाराष्ट्राच्या बुद्धिजीवी अभिजनांत आपला सहज समावेश व्हावा म्हणून आम्ही (तत्कालीन परंपरेप्रमाणे) ताबडतोब ' नेमाडपंथ ' स्वीकारला. गुरुमाऊली म्हणाली , फडके-खांडेकर एकदम बोगस... तेव्हा आम्ही म्हणालो , हो तर , पार कंडम.

माऊलींनी घोषणा केली , साने गुरुजी सर्वश्ाेष्ठ कादंबरीकार... आम्ही आमची आई सोडून ' श्यामची आई ' च्या मागे. (चांगल्या अर्थानं हो!)

आता सद्गुरूंनी (मूळ आफ्रिकी साहित्यविश्वातला) देशीवाद इकडे मांडल्याबरोब्बर आम्हीही अंतर्बाह्य देशीवादी झालो. काही नवदेशीवाद्यांनी (आपापल्या) घरांत देशीवादाचा इतका प्रसार केला की त्यांची पुढची पिढी आपसूक देशीवादी निपजली. आता ही पाच-सात वर्षांची देशीवादी पिढी नॅशनल जॉग्राफिक आणि कार्टून नेटवर्क सोडून ' गुडमॉनिर्ंग महाराष्ट्र ' दाखवणारी ' अल्फा ' नावाची मराठी वाहिनी पाहू लागली. ती पाहून त्यांना ' तो मी नव्हेच ' बाय पी.एल. देशपांडे ' ही एन्जॉय करता येऊ लागलं...

... असो , तर सांगायचा मुद्दा हा की यच्चयावत बापू-महाराज- बुवांप्रमाणेच आमचे सद्गुरूच आमची पंचाईत करतात. (इथेही ते एका श्ाेष्ठ परंपरेचं पालन करताहेत , याची आम्हाला जाणीव आहे.)

आता परवाच मुंबईच्या प्रेस क्लबात नेमाडेंनी आपला देशीवाद सहेतुक इंग्रजीतून समजावून दिला. त्यावेळच्या प्रश्नोत्तरांत त्यांनी हिंदू परंपरेचा खास गौरव केला. हिंदू परंपरेत (अन्य धर्मांप्रमाणेच) एकच एक प्रमाणग्रंथ नसल्यानं ही परंपरा कशी सर्वसमावेशक , व्यापक , उदार वगैरे आहे , असं त्यांनी सांगितलं. (हे विहिंप , बजरंग दल , रा.स्व.संघ , शिवसेना वगैरेंच्या व्यासपीठावरून कुणी बोललं असतं तर आम्हाला वैताग वगैरे आला असता आणि उदाहरणार्थ ही सगळी भंकस आहे , असं आम्ही म्हणालो असतो. पण इथे बोलणारी साक्षात गुरुमाऊली.)

पण , पुढच्याच प्रश्नाला नेमाडेंनी आमची विकेटच काढली. काही कट्टरवादी संघटना बहुसंख्यांच्या ' भावना दुखावल्या ' म्हणून , परंपरेचा अवमान केला म्हणून काही नाटकांवर बंदी लादताहेत , याबद्दल माऊली काय म्हणतात , तर तंत्र विकसित करा... कसलं , तर परंपरेचा अवमान न करता , परंपरेतच राहून , परंपरापूजकांच्या भावनांना धक्का न देता लिहिण्याचं. त्यासाठी माऊलींनी साक्षात गालिबची साक्ष काढली. तो (म्हणे) म्हणाला होता की , ' कलम मे गमीर् तो होनी चाहिए , मगर इतनी नहीं के पढनेवालों को शिकायत हो! ' भले बहाद्दर! म्हणजे आमच्या माऊलींनीही तोवरच्या मराठी लेखनपरंपरेला धक्केच दिले , तेही पुलंसारखी भलीभली मंडळी पेंगतबिंगत असताना त्यांना गदगदा हलवून. गालिबनं त्याच्या काळात वेगळं काय केलं ? आणि माऊलींचीही परममाऊली असलेल्या तुकारामबुवांनी तर परंपरेला हादरेच दिले. या सगळ्यांतूनच तर ही परंपरा समृद्ध झाली ना! आताच ती एकदम दुखरी कशी झाली बुवा ? आणि आमचे नेमाडे डॉक्टर एकदम ' पेशंटच्या कलानं घ्या ' म्हणून का बरं दटावू लागले ?

परंपरेचं भान नसणारी , परंपरेपासून फटकून राहणारी मंडळी जेव्हा परंपरेला आव्हान देणारं काही लिहिता-निमिर्तात , तेव्हा निर्माण होणारं ' फ्रिक्शन ' माऊलींना अयोग्य वाटतं म्हणे. म्हणूनच एकीकडे राम-अहिल्या कथेचे आणि एकंदर पौराणिक कथांचे किती श्ाील-अश्ाील अन्वयार्थ अवघ्या दीडशे वर्षांपूवीर् काढले जात होते , त्यातून कसा परंपरेचा अवमान वगैरे होत नव्हता , हे एका श्वासात सांगणारी माऊली दुसऱ्या श्वासात म्हणते , समाजाला न दुखावता लिहिण्याचं तंत्र विकसित केलं पाहिजे.

शिवाय (गुरूपरंपरेनुसारच) परंपरा म्हणजे काय , ती कोणी ठरवायची , तिचा अपमान , भावनांची दुखापत यांची काही स्टॅण्डर्ड (इंटरनॅशनल/ वेस्टर्न नव्हेत , निखळ देशी) मोजमापं आहेत का , वगैरे महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं काही माऊलींनी दिली नाही...

असो , ( परंपरेप्रमाणे) गुर्वाज्ञा पाळावीच लागते. तिच्यानुसार आता आता आम्हाला तंत्र विकसित करावं लागेल ते पेनाला कायमस्वरूपी टोपण कसं लावता येईल , याचं...

(महाराष्ट्र टाइम्स)

1 comment:

  1. परंपरेला दुखावत धक्के देत सांगायचेही एक तंत्र आहे. त्याचीही परंपरा आहे. आपण कोणत्या परंपरेला धरतो यावर अवलंबून आहे.
    आपल्याला यशवंतराव व्हायचे आहे की र. धो. कर्वे यावर बरेच अवलम्बून आहे.

    ReplyDelete