Monday, March 7, 2011

उत्स्फूर्त आणि अनपेक्षित


'' डॉक्टर डॉक्टर... इमर्जन्सी आहे... आमचे मान्यवर नेते , धर्मपरायण परमवीर अनपेक्षितपणे आजारी पडले आहेत. आम्ही

उत्स्फूर्तपणे त्यांना तुमच्या हॉस्पिटलात घेऊन आलोय. ताबडतोब त्यांना अॅडमिट करून घ्या... ''

'' हो हो हो , सबूर! तुम्ही असं करा... ते पलीकडचं हॉस्पिटल आमच्यापेक्षा अद्ययावत आहे , परमवीरांना तिकडेच दाखल करा... नाहीतर सरकारी हॉस्पिटल आहेच की... त्यापेक्षा खरं सांगू का , थेट मुंबईलाच हलवा त्यांना! ''

'' परिस्थिती गंभीर आहे डॉक्टर! तेवढा वेळ असता तर आम्ही डायरेक्ट लंडन नायतर अमेरिकेत नसतं का नेलं परमवीरांना ?''

'' बरोबर आहे तुमचं , पण कृपा करून दुसरं हॉस्पिटल बघा. ''

'' हे पाहा डॉक्टर , परमवीरांच्या आजाराच्या बातमीनं त्यांचे शेकडो अनुयायी उत्स्फूर्तपणे हॉस्पिटलबाहेर गोळा झालेयत! तुम्ही परमवीरांना अॅडमिट नाही करून घेतलंत तर त्यांच्याकडून अनपेक्षितपणे काहीही घडू शकतं हे लक्षात ठेवा. ''

'' अॅडमिट करून घेतल्यावर तरी काय वेगळं घडणार आहे हो ? कोणत्याही बड्या नेत्याला ' हात लावणं ' आताशा पोलिसांइतकंच रिस्की वाटतं आम्हाला! ''

'' रिस्की ? डॉक्टर , जरा विचार करा! परमवीरांवर इथे उपचार झाले आणि ते खडखडीत बरे झाले तर या हॉस्पिटलकडे शहरातल्या यच्चयावत व्हीआयपींची उत्स्फूर्तपणे रीघ लागेल. आणि तुम्ही अनपेक्षितपणे रातोरात सेलिब्रिटी होऊन जाल. वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमध्ये तुमचे कॉलम सुरू होतील. ठिकठिकाणी फोटो छापून येतील. देशविदेशांतल्या बड्याबड्या हॉस्पिटलांमध्ये कन्सल्टन्ट म्हणून , व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून , डायरेक्टर बोर्डावर नेमणूक होईल. टेबलावरून आणि टेबलाखालूनही पैसा धो धो वाहू लागेल... ''

''... हे सगळं खरं आहे हो! पण आमचं वैद्यकशास्त्र की नाही , बिनडोक उत्स्फूर्तपणावर नाही चालत ? त्यामुळे आम्ही प्रयत्नांची शिकस्त करूनही अनपेक्षितपणे परमवीरांचं काहीतरी बरंवाईट होऊ शकतं. तसं काही झालं तर तुम्ही उत्स्फूर्तपणे काय धिंगाणा घालाल ते नाही सांगितलंत ? ते मी सांगतो. तुम्ही परमवीरांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना बेदम मारहाण कराल , तुम्हाला रोखू पाहणाऱ्या आणि तुमचा नंगानाच टिपू पाहणाऱ्या प्रत्येकाची तीच गत कराल. हॉस्पिटलची मोडतोड कराल , बाकीचे पेशंट जिवंत आहेत हा त्यांचा अपराधच आहे , अशा रीतीनं त्यांच्यावर तुमच्या शैलीचे ' उपचार ' कराल... त्यातून आमचं हॉस्पिटल बंद पडेल कायमचं! मग आमचे मालक ' सम्राटांनी माफी मागावी ' असं उत्स्फूर्तपणे संतापून म्हणतील आणि नंतर अनपेक्षितपणे शेपूट घालतील. हॉस्पिटलचे चारपाचशे कर्मचारी मात्र रस्त्यावर येतील. ''

'' कमॉन डॉक्टर! इथे परमवीरांच्या बंदोबस्ताचे पोलिस आहेत , ते करतील कन्ट्रोल! ''

'' पोलिस... ? ते दंडुके दंगेखोरांच्या हातात सोपवून उत्स्फूर्तपणे पळ काढण्यात एक्स्पर्ट! यात अनपेक्षितही काही नाही म्हणा! ''

'' काळजी करू नका उगाच ? आता युतीची सत्ता नाहीये राज्यात. त्यामुळे कार्यकतेर् शांतताप्रिय झाले आहेत! ''

'' अहो , सत्ता तुमची असली नसली तरी काय फरक पडतो ? आता आहेत तेही तुमचेच भाईबंद! ''

'' हे पाहा , असं काही घडलंच तर राज्य मानवी हक्क आयोगाकडून न्याय मिळवू शकताच! ''

'' अहो , आयोगही तुमचीच लाइन चालवणार. झालेला प्रकार उत्स्फूर्त आणि अनपेक्षित होता , म्हणून कुणावरही ठपका ठेवता येणार नाही , असा निर्वाळा देणार. ''

'' च्यामारी! डॉक्टर , फार पिरपिर ऐकली तुमची! आता परमवीरांना करताय अॅडमिट की... ''

'' थांबा थांबा! महादू , खडू आण. हॉस्पिटलबाहेर ठेवायचा बोर्ड घे लिहायला. लिही , ' या हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे आजारी पडले असून सर्व रुग्ण अनपेक्षितपणे खडखडीत बरे झाले आहेत. सबब हे रुग्णालय बंद करण्यात येत आहे.''

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment