Tuesday, March 1, 2011

मराठी माणूस कसा ओळखावा?



मुंबई आणि पुण्यात, खरंतर आता महाराष्ट्राच्या प्रत्येकच मोठय़ा शहरात मराठीत बोलणारया/ न बोलणाऱया, जन्माने किंवा 'कर्मा'ने मराठी असलेल्या/ नसलेल्यांची इतकी दाटी झाली आहे. की यात कोण मूळ मराठी भाषक आहे आणि कोण  नाही, हे कळेनासंच झालं आहे. मुंबईत वावरणाऱयाला तर (सतत परभाषांतच बोलत राहिल्याने) बऱयाचदा आपण स्वत:च मराठी भाषक आहोत की नाही, असं कोडं पडू शकतं. तेव्हा आपण मराठी भाषक आहोत की नाही, याची वेळोवेळी झटपट खातरजमा करण्यासाठी उपयुक्त अशी ही मार्गदर्शिका (guide) आम्ही देत आहोत. ती वाचत-सोडवत जाल, तशी खात्री होत जाईल की, हो, आपण मराठीच!

1: मुंबईत एखाद्या फलाटावर (platform) आपण मराठी वृत्तपत्र (newspaper) वाचत उभे आहोत. अचानक एक जण येऊन विचारतो, ``ये नवाकाल किधर से लिया आप ने?'' यात आपल्याला काहीच खटकत नाही. आपण निर्विकारपणे वृत्तपत्रविक्रेत्याकडे (newspaper vendour) बोट दाखवतो...
... म्हणजे आपण मराठीच!

... आणि तो माणूस तिथून मराठी वृत्तपत्रच खरेदी करून आपल्या शेजारीच ते वाचत उभा राहतो...
... म्हणजे तोही मराठीच! (उभयतांच्या मराठीपणाची पक्की खात्री करून घ्यायची असेल, तर वृत्तपत्रातल्या बातमीवर त्याच्याशी हिंदीत चर्चा सुरू करा. तोही हिंदीतच बोलेल.)

त्या वृत्तपत्रविक्रेत्याकडे आपण जेव्हा `चित्रलेखा द्या किंवा महानगर द्या किंवा सामना द्या' अशी स्वच्छ मराठीत मागणी करतो तेव्हा तोही स्वच्छ मराठीतच `हिंदी देऊ की मराठी?' असा प्रतिप्रश्न करतो... म्हणजे तोही 100 टक्के मराठीच!

2: एका उद्यानात (garden/ park) आपल्या चार-पाच वर्षांच्या मुला/नातवंडाबरोबर आपण जातो. तिथल्या प्राण्यापक्ष्यांना किंवा मत्स्यालायातल्या (aquarium) माशांना पाहून ते मूल आनंदाने `हत्ती/ मोर/ घोडा/ मासा' असं म्हणत न नाचता `एलिफंट/ पिकॉक/ हॉर्स/ फिश' म्हणून उडय़ा मारतं, तेव्हा आपलंही मन- त्या मुला/ नातवंडानं आज खानदानाची लाज राखली अशा भावनेनं- सद्गदित होऊन समोरच्या कारंज्यातल्या (fountain) पाण्यासारखं थुईथुई नाचू लागतं ना?... म्हणजे आपण मराठीच!

हेच मूल पुढे बोबडय़ा बोलीत `स्काय ब्लू आहे' `रोझ पिंक आहे' `टीचर स्टुपिड आहे' अशी पाहिली `मराठी' वाक्यं उच्चारतं, तेव्हा आपले सर्व पितर (forefathers) स्वर्गात पोहोचल्याचा आनंद दाटून येतो ना?...
मग आपण मराठीच!

3 : रस्त्यात, बसस्टॉपवर, रिक्षात, बसमध्ये, लोकलमध्ये किंवा अगदी आपल्याच दारात कोणाही अनोळखी माणसाशी (stranger) काही बोलायची वेळ आली की, आपली मातृभाषा ही या राज्याची राजभाषा आहे, हे विसरून आपण थेट हिंदीत किंवा इंग्रजीत बोलायला सुरुवात करतो... 
म्हणजे आपण मराठीच.

4 : ``आमच्या हृतिकला किंवा ऐश्वर्याला की नाही, मराठी बोलायचा सरावच नाही हो अजिबात, लहानपणापासून सगळं ऍटमॉस्फियरच इंग्लिश आहे ना त्यांचं!'' हे वरपांगी खेददर्शक वाक्य- `आमच्या यांना की नाही, कपभर चहाही नाही येत हो करता' किंवा `आमचे हे ना फारच `कंझर्वेटिव्ह'- अशा वरपांगी खेददर्शक पण कौतुकानं लदबदलेल्या वाक्यांच्या चालीतच येतं ना आपल्या तोंडून?...
मग आपण मराठीच!

5 : आपल्या वस्तीत (area) तीन पिढय़ांपूर्वी `मुलूख से' केवळ एक लोटा आणि दहा नातेवाईक घेऊन आलेला परप्रांतीय दुकानदार आता चार दुकानांचा आणि आपल्या चाळीसकट तीन चाळींचा मालक झाला आहे. (शिवाय, त्याचा मलबार हिलवरच्या शाकाहारी सोसायटीत प्रशस्त फ्लॅटही आहे.) त्याला या वाटचालीत आजतागायत मराठीचा एक शब्दही उच्चारण्याची गरज पडलेली नाही या महाराष्ट्रात
मग खात्रीच बाळगा... आपली अख्खी वस्ती मराठी आहे.

6 : आपलं बोलणं कुणी आपल्या नकळत ध्वनिमुद्रित (record) केलं आणि ते ऐकताना असं लक्षात आलं की, सलग दहा वाक्यांत आपण एकही इंग्रजी शब्द वापरलेला नाही... तर काय होईल?
) आपलं मराठी इतकं बिघडलं? या कल्पनेनं कावरेबावरे होऊन आपण `स्पोकन मराठी'चा क्लास कुठे आहे का, याच्या चौकशीला लागू.
) आपला स्वत:च्या कानांवर, ध्वनिमुद्रण करणाऱयांच्या तांत्रिक ज्ञानावर आणि ध्वनीफितीच्या (ऑडीयो टेप) अस्सलपणावर मुळात विश्वासच बसणार नाही
यातली किंवा यासारखीच प्रतिक्रिया झाली तर समजा...  
आपण मराठीच!

7 : `आंत्रप्रुनर' हा 'आंत्रपुच्छ' या शब्दाइतकाच अभद्र वाटणारा शब्द अचूक स्पेलिंगसकट आपल्या जिभेवर अगदी सहजगत्या रुळला आहे. `क्नॉलेड्ज' असं लिहून त्याचा `नॉलेज' असा उच्चार करण्याची इंग्रजी व्याकरणपरंपरा आपल्याला कौतुकास्पद वाटते. पण, मित्र हा शब्द लिहिताना `मीत्र' असा लिहिला तर काय बुवा घोडं मारलं जातं मराठी व्याकरणाचं, असा निरागस प्रश्न आपल्याला पडतो... 
मग आपण मराठीच!

8 : आपल्या मराठी बोलण्यात सहजगत्या येणारे इंग्रजी शब्द ही `अनअव्हॉयडेबल नॅचरल प्रोसेस' असतो, आपल्या मनात इंग्रजीत उमटणाऱया या शब्दांना मराठीत मुळी प्रतिशब्दच नाहीत, असा आपला दावा असतो. मराठीतले चपखल शब्द माहिती नसण्याचा अडाणीपणा कदाचित आपल्याकडून होत असेल, अशी शंकाही (doubt) आपल्या मनाला चाटून जात नाही, हो ना?
...मग आपण मराठीच!

9 : नाना फडणविसाने घेतलेली मातृभाषा वदवून घेण्याची परीक्षा ठाऊक आहे? एका बहुभाषाकोविदाची (pollyglot) मातृभाषा जाणून घेण्यासाठी नानांनी तो झोपलेला असताना त्याच्या तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि तो माणूस त्याच्या मातृभाषेत ओरडत उठला. हेच कुणी आपल्या बाबतीत केलं, आपण गाढ झोपेत असताना कुणी चेहऱयावर पाण्याचा हबका मारला, तर (आपापल्या वयोगटानुसार) आपल्या तोंडून `ओह शिट!', `हू द हेल', `हू द फ...' `मम्मी...' असे उद्गार बाहेर पडतील?
...मग आपण मराठीच!

10 : चार मित्रांमध्ये वऱहाडाकडच्या कुणी `मले तुले' सुरू केलं किंवा कुणी कोकण्यानं `खाल्लन, पिलंन, घेतलंन' सुरू केलं किंवा कुणी देशावरचा `आनि पानी लोनी'च्या भाषेत बोलू लागला की हसण्याची उबळ दाबण्यासाठी आपण पदर, स्कार्फ, ओढणी किंवा रुमाल तोंडावर दाबून तोंड फिरवतो का? किंवा न राहवून फिस्सकन् हसतो का?
`जरा शुद्ध बोलायला शीक' असा सल्ला त्याला देतो का? किंवा आपण मराठीच्या या बोलींपैकी एखादी बोलणाऱयांतले असलो, तर हा सल्ला देणाऱया माणसांसारखं `शुद्ध' मराठी बोलता येत नाही, याचा न्यूनगंड (inferiority complex) आपल्याला आयुष्यभर छळतो का?
त्यांच्यासारखंच 'शुद्ध' बोलायला शिकायचं, ही आपली आयुष्यभराची महत्वाकांक्षा बनून जाते का?
...मग आपण मराठीच!

11 : ही मार्गदर्शिका समजून घेण्यासाठी आपल्याला वरच्या मजकुरातल्या कंसांचा खूप उपयोग झाला का?

तर मग, आपण hundred percent मराठी भाषकच आहोत, याचा आणखी काय पुरावा पाहिजे?

('...मग आपण मराठीच!' या शीर्षकाने 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित)

1 comment:

  1. याआधी इथे एक कमेन्ट होती. व्यक्तिगत हेत्वारोप करणारी आणि अर्थातच निनावी. ती मी काढून टाकली आहे. ज्याला किंवा जिला व्यक्तिगत धुणी धुवायची असतील, त्यांनी बदनामीकारक आरोप आपल्या नावाने करावेत, म्हणजे मी ही नावाने आणि नावे घेउन उत्तरे देईन. अन्यथा खासगीत समाज-गैरसमज दूर करून घेता येतील.

    ReplyDelete