Tuesday, July 29, 2014

अच्छे दिन-बुरे दिन

रात्रीच्या अंधारात `बुरे दिन' अंगावर कांबळ ओढून बाहेर पडले, तरी त्यांच्या डोळय़ांना रस्त्यातल्या गाडय़ांचासुद्धा प्रकाश सहन होत नव्हता... त्यांच्या डोळय़ांना प्रकाशाची सवयच राहिली नव्हती... हे साहजिकच होतं म्हणा! कारण, `बुरे दिन' बरेच दिवस अंधारात दडून बसले होते...
...ही वेळ आपल्यावर येणार याची त्यांना कल्पना होती... पण, माणसांप्रमाणेच दिवसांनाही वेडी आशा असतेच. त्यांनाही असं वाटलं होतं की पप्पूची लॉटरी लागेल आणि आपलं राज्य निर्वेध सुरू राहील. पण, पप्पू फेल झाला आणि `बुरे दिन'चे `बुरे दिन' सुरू झाले... एरवीही लोकांना त्यांच्याविषयी प्रेम नव्हतंच, नफरत होती. खरंतर वाईट दिवस माणसाला आयुष्यभर उपयोगी पडतील, असे धडे शिकवतात. पण, तरीही त्यांना कोणी प्रेमाने जवळ करत नाही किंवा आग्रहाने बोलावून घरीही आणत नाही. रस्त्यात कधी बाहेर पडायची वेळ आली तरी `बुरे दिन'ला तोंड लपवून फिरायला लागायचं. सगळीकडे त्यांच्या नावाने लोक कडकडा बोटं मोडताना दिसायचे. नाही नाही ते शिव्याशाप ऐकून `बुरे दिन'चा जीव तळतळायचा. पण, बोलायची सोय नव्हती. तरीही देशात आपला बोलबाला आहे, लोक आपल्याला घाबरतात, देशभर आपलंच राज्य पसरलंय, हे ऐकू यायला लागल्यानंतर `बुरे दिन'ची छाती अभिमानाने भरून बिरून आली होती. हा सगळा परिणाम आपल्या पक्षात, पक्षाबाहेर, देशात, जगात इतर कोणालाही न मोजणार्या नम्मोजी कोतवालांच्या भाषणांचा होता. आधी `बुरे दिन'चा जीव हरखला आणि जसजशी निवडणूक जवळ आली तसतसा त्यांना आपल्याविरुद्ध लागलेला सापळा लक्षात आला. हे नम्मोजी कोतवाल आपला उदोउदो करतायत ते आपल्याला हुसकवायला आणि आपली जागा `अच्छे दिन' घेणार आहेत, हे कळल्यानंतर ते पिसाळलेच. पण, आता संतापून काही उपयोग नव्हता. नम्मोजी कोतवालाने निवडणूक खिशात घातली होती आणि देश आपल्या कुर्त्यावर गुलाबाच्या फुलासारखा टाचून घेतला होता.
निकाल लागल्यापासून आपलाही निकाल लागला हे लक्षात आल्यामुळे `बुरे दिन'नी स्वतःला दारं-खिडक्या बंद करून पुरतं कोंडूनच घेतलं होतं. आता कोतवालाचे महाराज बनलेल्या नम्मोजींची फौज कधी कुठून कशी घुसेल आणि आपल्याला हुसकावून बाहेर काढेल, या विचाराने त्यांची झोप उडाली होती. जी काही झोप लागायची, तिच्यातही आपल्याला एन्रॉन प्रकल्पाप्रमाणे समुद्रात बुडवून टाकलं आहे, असा भास त्यांना व्हायचा आणि दचकून जाग यायची. नंतर एन्रॉन प्रकल्पाचं तुकारामाच्या गाथेप्रमाणे तरला, त्याचाच दिलासा त्यांच्या मनाला वाटायचा. दाराबाहेर जरा खुट्ट झालं, जरा पावलं वाजली, जरा आवाज झाला, जरा चाहूल लागली तरी `बुरे दिन'चं हृदय थाडथाड उडायला लागायचं. अंगाचं पाणीपाणी व्हायचं. झाली, आपल्या हकालपट्टीची वेळ झाली, असं वाटून त्यांचं अवसानच गळायचं.
बरेच दिवस अशा भीतीच्या सावटाखाली दिवसरात्र कणाकणाने जळत-झिजत काढल्यानंतर अखेरीस आज त्यांनी `शेंडी तुटो वा पारंबी' असा निर्धार केला आणि रात्र होताच मनाचा हिय्या करून बाहेर पडण्याचा निर्धार केला...
...नजर थोडी प्रकाशाला सरावल्यानंतर `बुरे दिन'च्या मनातली भीती थोडी ओसरू लागली. आपल्याला पाहताक्षणी लोक आपल्यावर चाल करून येतील आणि आपली क्षणात चटणी होईल, असं `बुरे दिन'ना वाटलं होतं. किमान आपल्या पाळतीवर असलेले सरकारी लोक तरी पुढे येऊन आपल्याला ताब्यात घेतील आणि जाळीच्या व्हॅनमधून आपली रवानगी होईल, असंही त्यांना वाटलं होतं. त्यातलं काहीच होत नव्हतं. लोकांचं `बुरे दिन'कडे लक्षच नव्हतं म्हणा किंवा त्यांच्या अस्तित्त्वाचं काही विशेष वाटलं नाही म्हणा; पण संपूर्ण रस्त्यात त्यांना कोणीही हटकलं नाही. नम्मोजी महाराजांच्या महालाच्या दारातले शिपाई तरी आपल्याला अटकाव करतीलच आणि मग आपण त्यांचं कडं तोडून जिवाच्या कराराने आत शिरू आणि नम्मोजींच्या पायावर लोळण घेऊ, असं एक कल्पनाचित्र त्यांनी रंगवलं होतं. पण, तसंही काही झालं नाही. उलट आपलं नाव सांगितल्यानंतर नम्मोजींच्या दारातल्या गर्दीतून त्यांना प्राधान्याने आत सोडलं गेलं. एक सचिव महोदय तर `नम्मोजी केव्हापासून आपली वाट पाहात आहेत' असंही म्हटल्याचं त्यांच्या कानांवर पडलं, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला.
खरंच होतं ते! आत नम्मोजी हसर्या चेहर्याने स्वागताला सज्ज होते. तोंडभर हसून `केम छो' म्हणत त्यांनी `बुरे दिन'चं स्वागत केलं आणि तोंडात सुरती खमणचा घास भरवला तेव्हा `बुरे दिन' चक्रावूनच गेले. मग त्यांच्या मनात विचार आला, हा बनिया माणूस. कोण कधी गिर्हाईक म्हणून समोर येईल याचा भरवसा नसल्याने उगाच कोणाशीही वाईटपणा कशाला घेईल. आपली गच्छंती करतानाही प्रेमानेच केली जाणार. ठीकाय. लाथ खाऊन जाण्यापेक्षा हे बरं!
``बोलो, काय काम काढलंत?''
``निरोप घ्यायला आलो होतो... म्हटलं आता तुम्ही आलाच आहात, तर आमची जाण्याची वेळ झालेली आहे. अपमानित होऊन जावं लागण्यापेक्षा स्वेच्छेने निघालेलं बरं...''
``अरे, शुं वात करू छू? एम कोन बोला?''
``म्हणजे काय? अहो, तुम्हीच तर तुमच्या सगळय़ा प्रचारात जिथे तिथे सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले है, अच्छे दिन आने वाले है... आता अच्छे दिन येणारच असतील, तर आम्हाला जावंच लागेल ना?''
हा हा हा हा! मोठा विनोद झाल्यासारखे नम्मोजी महाराज हसायला लागलेले पाहून `बुरे दिन'चं पित्त आणखीनच खवळलं. कसाबसा संताप आवरून ते म्हणाले, ``महाराज, एक प्रश्न विचारू? तुम्हाला आपल्या देशाचा फार अभिमान आहे. तुमच्या पक्षाला तर आपल्या देशात कधीच नव्हत्या अशाही अभिमानास्पद गोष्टी दिसतात आणि ज्यांची लाज वाटायला पाहिजे अशा गोष्टींचाही गर्व वाटतो. तुम्हाला देशाची फॉरेनर बहू चालत नाही, पण देशात तेवढेच फॉरेनर अच्छे दिन आणण्याची गोष्ट करता... गेल्या कित्येक शतकांमध्ये या देशाने हे अच्छे दिन कधी पाहिलेलेच नाहीत. ते आपल्यासाठी इटालियन बहूपेक्षा जास्त परके आहेत. त्यांना तुम्ही घेऊन येणार आणि स्वदेशी बुरे दिन घालवणार... आम्ही या मातीत जन्मलो, वाढलो, हा देश त्याच मातीत घालण्यासाठी राबलो आणि तुम्ही आम्हाला आमच्या कष्टांचं हे इनाम देणार?'' आता `बुरे दिन'ना शोकसंतप्त हुंदका फुटला.
``अरे, रो मत रो मत. हा रूमाल घ्या. डोळे पुसा. नाक शिंकरू नका. आ पंडित नेहरूना रूमाल नथी फ्रान्समध्ये धुवायला जायला. हा माझ्याकडचा एकमेव ऐतिहासिक रूमाल आहे, जो मी निवडून आल्यावर ठिकठिकाणी भावविवश भाषणं करताना डोळे पुसायला वापरला होता. हं... आता मी काय सांगतो ते ऐका. वात सुनो मारी. ही अच्छे दिनची आयडिया पण मन्नूजी महाराजांची आहे!''
``काय सांगता काय!''
``म्हणजे काय? तेच एका भाषणात म्हणाले होते की जगातली परिस्थिती खराब आहे म्हणून भारताची हालत खराब आहे. आता काही दिवसांनी दुनियेची हालत सुधारेल ने बिजा भारताची पण हालत आपोआप सुधारेल. अच्छे दिन आनेवाले है. आता एवढा मोठा इकनॉमिस्ट माणूस खोटा बोलेल काय?''
``म्हणजे तुम्ही त्यांची लाइन उचललीत?''
``अरे एमां शु बडी बात छे? आम्ही त्यांचे दीडशेपेक्षा जास्त उमेदवार उचलले, त्यांची फॉरेन पॉलिसी, इकनॉमिक पॉलिसी उचलली, एक लाइनने काय फरक पडतो?''
``काय फरक पडतो? अहो, तिकडे देशाची हालत सुधारो ना सुधारो. आमची हालत खराब झाली ना! आम्ही आता गाशा गुंडाळून जायचं कुठे, सांगा जायचं कुठे?''
``कुठेच नाही.''
आता संपूर्णपणे चाट पडून `बुरे दिन' म्हणाले, ``अहो, तुमचं धोरण तरी नेमकं काय आहे? अच्छे दिन येणार असतील, तर आम्हाला जावंच लागेल. गंमत कसली करताय?''
नम्मोजी हात हवेत भिरकावत म्हणाले, ``अरे पण मी अच्छे दिन आणू कुठून?''
`बुरे दिन' आता कोसळायचेच बाकी राहिले होते. नम्मोजी म्हणाले, ``पावसाचा पत्ता नाही. जगातली आर्थिक स्थिती बाराच्या भावात गेलेली आहे. इराकमध्ये गेंधळ चाललाय. तेलाचे भाव वाढतायत. तिजोरीत खडखडाट आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणारं काहीच हातात नाही आणि चांगले दिवस येतील कसे? सगळय़ा जगाशी आता आपण जोडलेले आहोत. सगळं जग खस्ता खात असताना आपल्याला मेवा कुठून खायला मिळणार? लोकांनी समजून घेतलं पाहिजे. देशासाठी त्याग करायला शिकलं पाहिजे.''
``अहो, पण मन्नूजी महाराजांच्या सरकारच्या काळातही हीच परिस्थिती होती. तेव्हा तुम्ही रजनीकांत बनून भलभलती स्वप्नं दाखवत होतात...''
``अरे, पण तो तर सिनेमाच होता... इंडियानी सबसे बडी फिल्म... सौ करोड, दो सौ करोड की नहीं, दो हजार करोड की फिल्म... अब फिल्म तो सुपरहिट हो गयी... पिक्चर देखने के बाद कोई बोलेगा स्टोरीलाइन वीक है, ये नहीं है, वो नहीं है, तो क्या फर्क पडता है... पिक्चर तो सुपरहिट है...''
आता `बुरे दिन'च्या जिवात जीव आला. त्यांनी सावधपणे विचारलं, ``म्हणजे आम्ही कुठे जाण्याची गरज नाहीये. घाबरून जगण्याचीही गरज नाहीये.''
``अजिबात नाही. खुलेआम घूमो. तुम्हाराही राज है.''
``आणि वाटेत अच्छे दिन भेटले तर?''
``कुठून भेटतील? ते इथे आलेत कुठे? त्यांना काय वेड लागलंय काय इतक्या भंपक देशात यायला?''
``अरे बापरे, मग तुम्ही लोकांना काय सांगणार?''
नम्मोजींनी टाळी वाजवली. एक सेवक एक तबक घेऊन हजर झाला. तबकावरचं नक्षीदार कापड दूर करत नम्मोजी म्हणाले, ``कोणाला काही सांगायची गरज काय? अंगातले ते काळे, कुरूप, हिंत्र कपडे काढून टाका आणि हा नवा सुंदर रंगबिरंगी ड्रेस परिधान करा.''
``म्हणजे?''
``म्हणजे काय? या देशात दिवस बदलण्याची गरज नसते. राजवट बदलली तरी लोकांना काही काळ धुंदी चढते आणि त्या धुंदीत त्यांना काहीही सांगितलं तरी पटतं. आता नव्या कपडय़ांमध्ये तुम्हीच लोकांसमोर जायचं आणि आम्ही सांगणार, अच्छे दिन आ गये है...''
``पण, महाराज, सगळे लोक काही मूर्ख नसतात. एखादा तरी शहाणा असेलच. आम्हाला ओळखेलच. तेव्हा काय कराल?''
``सोप्पं आहे,'' डोळे मिचकावत नम्मोजी महाराज म्हणाले, ``तेव्हा आम्ही सांगणार की हा आधीच्या सरकारचा वारसा आहे. काँग्रेसने 65 वर्षांत जी वाट लावली, ती आम्ही लगेच कशी दुरुस्त करणार. अजून 65 वर्षं अच्छे दिन आले नाहीत, तरी हरकत नाही!''
यावर `बुरे दिन'नी नम्मोजींच्या हातावर कडकडीत टाळी दिली आणि ताठ मानेने, गर्वोन्नत माथ्याने ते महालाबाहेर पडले...

No comments:

Post a Comment