Sunday, August 21, 2011

डोकी ठेवा, टोप्या घाला!

आम्ही जागे झालो होतो, तेव्हाची गोष्ट.
 जागे म्हणजे काय अगदी टक्क जागे झालो होतो..
आम्हाला कोणीही पुन्हा झोपवू शकणार नाही, इतके जागे झालो होतो..
 
काय विचारताय? आम्हाला आधी कोणी झोपवलं होतं?
 
खरं सांगायचं, तर कोणीही नाही.. आमचे आम्हीच झोपलो होतो.. ती एक आम्हाला देणगीच आहे देवदत्त.. आजूबाजूला कितीही कोलाहल असो, गोंधळ असो, खुद्द आमच्या बुडाखाली आग लागलेली असो- झोपायचं ठरवलं की आमचे कान आपोआप पडतात, डोळे जड होतात आणि आम्ही कोणत्याही स्थळी बसल्याजागी मनोमन आडवेहोतो..
 
परवा असेच आम्ही शवासनात असताना एक पांढ-याधोप कपडय़ांतील गांधीटोपीधारी गृहस्थ समोर आले.. मागे प्रखर प्रकाश.. आम्हाला वाटलं निरमाची नवी जाहिरात.. पण नाही, चेहरा ओळखीचा वाटला.. अरे, हे तर आपले अण्णा!.. नमस्कार अण्णा!.. नमस्कार न स्वीकारता उग्रकठोर मुद्रेनं करारी सुरात अण्णा म्हणाले, ‘‘इथे देश भ्रष्टाचाराच्या आगीत होरपळतोय आणि तुम्ही झोपा काढताय? पाऊणशे वयोमान झालेलं असताना मी तुमच्या मुलाबाळांसाठी, पुढच्या पिढय़ांसाठी उपोषण करतोय आणि तुम्ही झोपा काढताय? जागे व्हा, जागे व्हा,’’ आता अण्णांचा आवाज म्हणजे देशातल्या 120 कोटी जनतेचा आवाज. विचार करा. तब्बल 120 कोटी लोक तुमच्या उशाशी उभे राहून बंडोपंत, झोपून काय राहताय, जागे व्हाम्हणून ओरडू लागले, तर तुम्ही कुंभकर्ण असलात तरी झोपू शकाल काय?.. शिवाय, आपण जागे झालो नाही, तर अण्णा आपल्याविरोधात उपोषण करायला बसतील, ही भीती..
 
शिवाय भानगड अशी की, तुम्ही मला जागं का केलंत? माझ्या झोपून राहण्याच्या अधिकारावर गदा का आणलीत? याचा जाब आपण अण्णांना विचारू शकत नाही..
कारण अण्णांना विरोध म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा. अण्णांना विरोध म्हणजे डायरेक्ट देशद्रोह. दुसरी प्रॅक्टिकल अडचण अशी की, झोपून राहण्याच्या अधिकारासाठी अण्णांच्याविरोधात उपोषण करायचं ठरवलं तर त्यासाठी जागं राहावंच लागणार.. झोपेत उपोषण करण्याची काही सोय नाही.. त्यापेक्षा जागं होणंच बरं, या विचारानं जागे झालो आणि जागे झाल्याबरोब्बर जे करणं क्रमप्राप्त, ते करायला चिंतनकक्षात रवाना झालो..
 
तिथेही टीव्ही, टीव्हीसमोरची बिवी आणि खिडकीतून तिची शेजारणींशी चाललेली माहितीची देवाणघेवाण यांचे संमिश्र आवाज कानी येत होते..
 
‘‘अहो, इथे शाळेतली मुलंमुली बघा काय सुंदर नटून आलीयेत..’’ (शाळांना राष्ट्रीय सुटी दिलीये की काय बेमुदत? की आमरण?.. आमच्या नतद्रष्ट मनात विचार!)
 
‘‘त्यापेक्षा या चॅनेलवर पाहा.. इकडे नंदेश पोवाडा गातोय..’’
 
‘‘वहिनी, ते सोडा, चटकन ते चॅनेल लावा.. किरण बेदी झेंडा घेऊन नाचतायत..’’
 
अण्णांच्या उपोषणावर इतक्या लगेच म्युझिक व्हिडीओही तयार झालाय की काय, ही उत्सुकता दाटून आल्याने चिंतन आटोपतं घेऊन, त्वरेनं हात प्रक्षाळून आम्ही टीव्हीसमोर येऊन ठाकलो, तर तोवर मूळच्या न्यूज चॅनेलचा जो म्युझिक चॅनेल झाला होता, त्याचा आता संस्कारचॅनेल झाला होता. म्हणजे समोर बुवा-बाबा-अम्मा-बापू-महाराजांपेक्षा तुपकट चेह-यानं भ्रष्टाचार थांबवण्याचे उपायया विषयावर प्रवचन सुरू होतं.. स्वत:ला बातमीदार म्हणवणारे, पंतप्रधान असो की मुख्यमंत्री- कोणालाही कशावरही जाब विचारल्याच्या सुरात उर्मट प्रश्न विचारणारे आक्रस्ताळे दंडुकेधारी इथे मात्र सत्संगाला आल्यासारखे मवाळ मुद्रेनं लीन-दीन होऊन जणू ज्ञानकण वेचत होते.. ‘‘नवरा घरी आला आणि त्याच्या खिशात त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम सापडली, तर बायकोने त्याला जाब विचारायला हवा..’’ अरेच्चा, हा प्रयोग तर आमच्या घरात दर रविवारी होतो.. आम्हाला दोस्तदारांबरोबर रमीचे चार डाव टाकण्याचा शौक आहे.. रुपया पॉइंट.. कधीतरी हात लागतो, आम्ही शीळ घालत घरी येतो, कपडे खुंटीला लटकवले रे लटकवले की बायको लगेच खिशात हात घालून नोटा नाचवत विचारते, ‘‘सकाळी खिशात मी माझ्या हातांनी त्रेसष्ट रुपये ठेवले होते, त्याचे एकशे बहात्तर रुपये कसे झाले? काय धंदे करता, कुठे उकिरडे फुंकता देव जाणे! कितीदा सांगितलं, असा हरामाचा पैसा पचत नाही..’’ असं म्हणून ती त्या रकमेतले शंभर रुपये हातोहात पचवते’.
 
भ्रष्टाचार संपवण्याचा हा इतका सोपा उपाय आपल्याला ठाऊक नव्हता आणि अण्णांनी आंदोलन करण्याच्या आधीपासून आपण नकळत का होईना त्या आंदोलनात खारीचा वाटा उचलत आहोत, या जाणीवेनं आमची छाती दीड वीत फुगली.. आंदोलनाचं निमित्त साधून टीव्हीपुढे फतकल मारण्याची शतकानुशतकांतून एखादवेळी लाभणारी सुसंधी आम्ही साधणार, तेवढय़ात खिडकीतून शेजारचे गजाकाका खेकसले, ‘‘बंडोपंत, बाहेर केवढी लढाई चाललीये आणि तुम्ही टीव्हीसमोर काय बसताय मेंगळटासारखे! चला, उठा, सामील व्हा..’’
 
हा हा म्हणता आमच्या अंगावर सदरा-पाटलोण चढली, डोक्यावर मी अण्णा आहेअसं लिहिलेली गांधी टोपीही चढवली गेली, ‘‘अहो, पण मी बंडोपंत आहे.. जसा असेन तसा मी मी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे..’’ आम्ही कातावून गजाकाकांना म्हणालो, तर मागून टप्पू मारत घारूअण्णा म्हणाले, ‘‘हे अहंकार विसर्जित करून टाका आता समष्टीमध्ये. आता आपण सगळेच अण्णा.’’
 
‘‘तुमचं बरं आहे, तुम्ही आधीपासूनच अण्णा आहात.’’
 
‘‘बंडोपंत, क्रांती करायची असेल, तर डोकं बाजूला ठेवायचं आणि टोपी चढवायची. ती महत्त्वाची.’’
 
आमच्या चार चाळींमधली चाळीस टोपीधारी टकली भ्रष्टाचार मिटायेंगे, सरकार को हटायेंगेवगैरे घोषणा देत चालली होती. त्या दिंडीत पाय ओढतओढत चालताना आम्ही आसपास पाहून घेतलं.. हा किराणेवाला मारवाडी.. तागडीत किलोतले 50 ग्रॅम हातचलाखीनं मारतो.. हा पोलिसमामा.. दिवसाची- साहेबाचा हप्ता देऊन- कमाई किमान हजारभराची.. हा बाळू महापालिकेत कामाला आहे, याच्या टेबलावरची फाइल हजाराच्या वजनाशिवाय पुढे सरकत नाही- चाळक-यांना पाचशे रुपये डिस्काऊंट.. हा आरटीआय कार्यकर्ता, तळमजल्यावरचा गाळा विकत घेऊन एअरकंडिशन्ड ऑफिस काढलंय यानं, एरियातल्या बिल्डरांची माहिती काढून ती न वापरण्याचे लाखांत पैसे घेतो हा- परवाच तिसरी गाडी आली दारात.. हा मंत्रालयातला शिपाई, साहेबाची हमखास भेट घालून देण्याबद्दल पगाराच्या दहापट कमाई करतो, गावाला बंगला बांधलाय ऐसपैस..
 
सगळे जोशात घोषणा देत होते, ‘अण्णा, आगे बढो, हम तुम्हारे साथ है..
  ..उन्ह तसं फारसं नसतानाही आम्हाला कसं कुणास ठाऊक पण एकदम गरगरायलाच लागलं.. आम्ही हळूचकन मोर्चातून काढता पाय घेतला.. आडोसा बघून आधी टोपी काढून टाकली.. नशीब डोकं अजून शाबूत होतं.. टोपीला चिकटून गेलं नव्हतं.. आता गरगर कमी झाली.. आम्ही घटकाभर उभ्याउभ्याच डोळे मिटून चिंतन केलं.. आतला आवाज काय म्हणतोय, ते ऐकलं.. आतून आवाज आला, ‘‘बंडोपंत, झोपा आता.’’.. अण्णांप्रमाणेच आम्हीही आतल्या आवाजाला फार महत्व देतो..
पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही खोली गाठून ताणून दिली.. माणूस जागा होतो, तो पुन्हा झोपी जाण्यासाठीच, हे जीवनसूत्र आम्हाला निद्राधीन होता होता गवसलं.. आणि स्वानुभवावरून सांगतो, अर्धवट जागृतीपेक्षा गाढ निद्रा अधिक श्रेयस्कर आणि आरोग्यकारी!

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २१ ऑगस्ट, २०११)

1 comment:

  1. काही मुद्यांशी असहमत...तरीही लेख एकदम भन्नाट आहे.

    ReplyDelete