Sunday, July 17, 2011

डोकं हलवू नका..

आम्हाला अलीकडे फार म्हण्जे फारच घाई झालेली आहे..  इतकी घाई की ‘म्हणजे’ म्हणायलासुद्धा वेळ नाही, ‘म्हण्जे’त काम भागवायचं आणि पुढे जायचं फटाफट..

..म्हण्जे माफिया गुंडांनी एखाद्या पत्रकाराला गोळ्या घातल्या किंवा मुंबईत त्रवार्षिक बाँबस्फोट झाले रे झाले की २४ तासांच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांना हुडकून जेरबंद करून आणलंच पाहिजे.. किंबहुना कुणी पिस्तूल घेऊन कुणाला गोळ्या घालायला किंवा कुणी कुठं स्फोटकं दडवायला निघाला असेल, तर पोलिसांनी त्याच्या मागावरच असलं पाहिजे.. इकडे गोळ्या घातल्या की तिकडे अटक. इकडे स्फोट झाला की तिकडे अटक.
 
बरं नुस्तं अटक करून भागायचं नाही.. ताबडतोब त्याचा निकाल लावून मोकळं झालं पाहिजे.. त्या अफजल गुरू किंवा अजमल कसाबच्यासारखं खटलाबिटला चालवून काळकाढूपणा करून त्यांना बिर्याणी खिलवत बसलात, तर अतिरेक्यांच्या बर्थडेला तेच आपल्यालाच भेट देणार.. स्फोटमालिकेची.
 
काय सांगताय? त्या दिवशी कसाबचा बर्थडेच नव्हता? त्याच्या जन्माची खरी तारीख कुणालाच ठाऊक नाही आणि कुठं नोंदलेलीही नाही? अर्र्र्र, आम्ही फार जबाबदार वर्तमानपत्रांमध्ये वाचलं होतं हो! आर यू शुअर? पण, ते काहीही असो. मुळात यांना जिवंत ठेवण्याचं कामच काय? सापडले की लगेच शिक्षा सुनावायची फासावर लटकवायचं. खरं तर अशा दहशतवाद्यांना जाहीरपणे फासावर लटकवलं पाहिजे, म्हणजे चांगली जरब बसेल.
 
काय म्हणताय?.. असं करता येणार नाही? का बरं, का? आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे म्हणून? जो कायदा अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकवू शकत नसेल तो जाऊ द्या चुलीत. कसाब आपल्या हातात असल्यामुळे पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय म्हणताय? पण, आम्हाला खून का बदला खून पाहिजे, त्याचं काय? पाकिस्तानात महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबईतल्यासारखे बाँबस्फोट महिन्याला तीन होतात आणि त्यांत पाचपट माणसं मरतात, असं सांगताय? त्याच्याशी आम्हाला काय देणंघेणं?.. पाकिस्तान स्थिर असणं आपल्या हिताचं आहे म्हणताय?.. आधी तुम्हालाच फासावर लटकवलं पाहिजे इतके भयंकर देशद्रोही आहात तुम्ही. हे तुमचं इंटरनॅशनल फालमफोक तुमच्याजवळच ठेवा आणि या दोघांना फासावर लटकावून टाका पटकन.
 
त्या भाडोत्री मारेकरी गुंडांवरही खटलेबिटले भरत बसू नका. हातात सापडले की लगेच गोळ्या घाला. आमचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट कसे खटाखट गोळ्या घालत होते.. अबतक छप्पन, अब सत्तावन, अब अठ्ठावन्न.. सगळी एन्काऊंटर बनावटच असतात, हे आम्हाला माहितीये (आम्हीपण हिंदी सिनेमे पाहतो!).. पण या गुंडांसाठी कशाला करायचीत खरी एन्काऊन्टर?.. उडवून टाकायचे धडाधड!
 
काय सांगताय? हे पोलिस अधिकारी माफिया टोळय़ांच्यासाठी शार्पशूटर म्हणून काम करत होते? त्यांची मोठमोठी प्रशस्त ऑफिसेस आहेत, महागडय़ा गाडय़ा आहेत, कोटय़वधी रुपयांची बेनामी मालमत्ता आहे? हेच आता टोळीवाले होऊन बसलेत? सगळय़ात आधी छप्पन्नचे सत्तावन्न करण्याच्या नादात निरपराधांनाही पकडून गोळ्या घालत होते?.. आता त्याला काय इलाज? सुक्याबरोबर थोडं ओलं जळणारच..
 
असा अकारण गोळी घातला जाणारा कुणी आपल्या घरातला, ओळखीतला, नात्यातला असता तर..
 तर आम्ही निरुत्तर..
पण तात्पुरतेच.. कारण काहीही झालं तरी एक पक्कं आहे.. आम्हाला सगळं काही ताबडतोब हवं आहे..
तुमच्याच्यानं होत नसेल, तर आम्ही ते करू शकतो.
बघायचं असेल, तर या पनवेलला. रात्री उशिरानंच या. कोणत्याही वाहनानं या, चालत या. ज्या गावांच्या परिसरात दरोडे पडतायत, त्या भागात आलात की गस्त घालणारे आम्ही दिसूच तुम्हाला. दिसू म्हण्जे काय, घेरूच की तुम्हाला सगळे मिळून. तुम्ही ओरडाल, गयावया कराल, हातापाया पडाल, ओळख सांगू पाहाल. आम्ही काही म्हण्जे काहीही ऐकणार नाही. दरोडेखोरांना लाजवेल अशा क्रूरपणे आमच्या लाठय़ा तुमच्या मस्तकांच्या चिरफाळ्या करतील.. लाठय़ांनी नाही भागलं तर आम्ही दगड घालू डोक्यात आणि संपवून टाकू तुम्हाला!
 आमच्या भागात दरोडे पडत असताना इथल्या- सर्वासाठी सर्वकाळ खुल्या- रस्त्यांवरून जाण्याची, वाट चुकण्याची किंवा कुणाकडे पाहुणे म्हणून येण्याची चूक तुम्ही करूच कशी शकता? त्या चुकीची आम्ही कठोर शिक्षा देणार म्हणजे देणारच. भविष्यात तुम्ही अशी चूक पुन्हा करताच कामा नये, यासाठी आम्ही तुम्हाला चूक करायला शिल्लकच ठेवणार नाही. जमाव नावाचं जनावर बनून आम्ही जेव्हा जेव्हा निघतो, तेव्हा तेव्हा पाकिटमार, भुरटे चोर यांचा आम्ही असाच पक्का ‘बंदोबस्त’ करतो. आता तुम्ही दरोडेखोर नाही, निरपराध सामान्य माणूस आहात, हा एक छोटासा, दुर्लक्षणीय, दुर्दैवी योगायोग आहे.. अगदीच बिनमहत्त्वाचा. हवंतर नंतर त्याबद्दल आम्ही मनातल्या मनात (तुमची नाही, परमेश्वराची) क्षमा मागू, शिर्डीला-सिद्धीविनायकाला उलटं चालत जाऊन पापक्षालन करू, सोन्याचा छोटा माणूस बनवून काशीला दान करून येऊ. पण, आधी तुमचा सफाया पक्का!
घाबरू नका.. आमच्याकडे असे भेदरून बघू नका. आम्ही काही कोणी दहशतवादी नाही, माफिया गुंड नाही किंवा दरोडेखोर नाही.. आम्ही सामान्य माणसंच आहोत तुमच्यासारखी. सगळं जग ‘उत्तिष्ठ जाग्रत’ करत असताना शतकानुशतके कर्मविपाकाच्या कुंभकर्णी काळनिद्रेत घोरत पडलेल्या शांत निवांत देशाचे भयग्रस्त आणि भयगंडत्रस्त नागरिक. आम्ही ऐहिक-पारलौकिकाच्या भोव-यांमध्ये गटांगळय़ा खात असताना जग पुढे गेलं.. आमच्या ‘इंडियन स्टँडर्ड टाइम’ दाखवणा-या ब्रह्मदेवाच्या घडय़ाळात ‘आता वाजले की बारा’चा अलार्म वाजू लागल्यानंतर जागे होऊन आता आमची घाईगडबड सुरू झाली आहे.. आठ बावन्नची लोकल पकडायची असताना आठ अठ्ठावीसला जाग आलेल्या माणसासारखी. लेटमार्क पडू नये म्हणून आम्ही देश चालवण्याच्या, समाजरचनेच्या सगळ्या यंत्रणा, कायदेकानू, व्यवस्था वगैरे डायरेक्ट इम्पोर्ट केल्या.. त्या व्यवस्थित चालवण्यासाठी माणसं व्यवस्थित तयार करणं, त्यांच्यात राष्ट्रीय चारित्र्य, स्वत:पलीकडे पाहण्याची वृत्ती, आपलं काम इमानेइतबारे, चोख करण्याची संस्कृती रुजवणं, समाजाविषयी, देशाविषयी व्यापक आस्था निर्माण करणं ही फुटकळ कामं घाई-गडबडीत राहूनच गेलीयेत....त्यामुळे आता यंत्रणा काम करतात की नाही, आम्हाला काही कळत नाही. त्यांचं कामकाज कसं चालतं, तेही आम्हाला कळत नाही. त्यामुळे आमची चिडचिड होते. चिडचिड झाली की आम्ही..
..
 ....डोकं सरळ ठेवा, सारखं हलवू नका.. दांडकं हाणायचंय.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, १७ जुलै, २०११)

No comments:

Post a Comment